सायन रुग्णालयातील, के ई एम रुग्णालयातील परिस्थिति मिडिया ने ज्या प्रकारे मीठ मसाला लावून दाखवली ते पाहून फार वाइट वाटले. असो ती त्यांची रोजी- रोटी आहे , पण ती अवस्था का ? ही सत्यस्थिती जर लोकांपर्यंत पोहोचली असती तर बरे वाटले असते. जशी न्यूज व्हायरल झाली प्रत्येकाने आम्हाला फॉरवर्ड करुन विचारले हे खरे आहे का? आणि आम्हीही न डगमगता उत्तर दिले…होय हे खरे आहे!!!
तुम्हाला महित आहे ? अखंड भारतात के. ई .एम . आणि सायन ही दोन रुग्णालये नामवंत आहेत. मुंबई बॉम्ब ब्लास्ट असो, ९३ च्या दंगली असो वा २६ जुलैचा पाऊस असो अनेक प्रसंग याच रुग्णालयांनी उत्तम प्रकारे कार्य केले आहेत आणि आता कोविड सारख्या महामारी मध्ये देखील ते तितकेच सज्ज आहेत. या दोन रुग्णालयांवर किती ताण आहे याचा कधी आराखडा तरी तुम्ही घेतलाय? रोज असे कित्येक रुग्ण आम्ही बघतोय जे इथल्या सुविधा घेण्यासाठी देशाच्या कनकोपऱ्यातून येतात आणि बरे होऊन आपापल्या घरी परत जातात. हि दोन रुग्णालये आहेत म्हणून गरीब आणि मध्यमवर्गीय लोक आपले उपचार करू शकतात. अन्यथा खाजगी रुग्णालयांची परिस्थिति सर्वांनाच अवगत आहे.
आज २-४ मृतदेह काय दिसले किंवा एका बेडवर दोन रूग्ण काय दिसले तर लगेच न्यूज भेटली आणि ती व्हायरल पण झाली. हव्या तशा टिप्पण्या करुन पण मोकळे झाले , पण ते दोन रूग्ण एका बेडवर का असतील? असा विचार नाही आला मनात कधी? अहो आम्हाला पण हौस नाही एका बेडवर दोन रूग्ण ठेवायची आणि दुप्पट कामे करायची.
देशातील क्रमांक -१ ची झोपड़पट्टी “धारावी”…! सगळ्यात जास्त कोविड रूग्ण कुठे तर धारावीत. नुसतेच कोविड नाही तर सगळ्याच आजारांचे सगळ्यात जास्त रूग्ण धारावीत असतात आणि असच नाही तर गेल्या १५ वर्षाच्या अनुभवावरुन मी हे ठामपणे सांगतेय, मग हे रूग्ण उपचारसाठी जाणार कुठे? सायन मधेच ना?
आता विषय येतो कोविडचा, खरे तर तुमच्या माहितीसाठी सायन आणि के ई एम ही दोन्हीही रुग्णालाये फक्त कोविड रुग्णालय नाहीत…परिणामी बाकीच्या आजारांचे सर्व रूग्ण दाखल होणार इथेच आणि बाकीचे कोविड रुग्णलाये ही पूर्णपणे भरल्या कारणाने परिणामी कोविड पॉझिटिव्ह देखील नाइलाजाने इथेच उपचार घेतात. जागा नाही म्हणून रूग्ण परत पाठवायची परवानगी देखील या रुग्णालयांना नाही, रोजची डोळ्यासमोरची उदाहरणे आहेत, अक्षरशः डॉक्टरांसमोर नातलग केविलवाणे चेहरे करुन हात जोडून विनंती करत असतात. जागा नाही हे माहित असताना देखील जमिनीवर झोपून उपचार करुन घेण्यास ते तयार असतात, कारण त्यांची परिस्थिती नसते बाहेर जाऊन उपचार करुन घेण्याची…
आता याला माणुसकी म्हणावे की हलगर्जिपणा हे पूर्णत: तुमच्या विचार शैलीवर निर्भर करते.
आता विचार करा सर्वतोपरी प्रयत्न करूनही अशा परिस्थितीत जर बेडवर रूग्ण मरण पावतो तर त्याची सर्व फॉर्मालिटी पुर्ण होईपर्यंत मृत शरीर ठेवणार कुठे? जिथे रुग्णांसाठीच जागा अपुरी पड़तेय..!!
आणि हो रुग्ण मृत झाल्यानंतर नातलगांना मृत शरीर हस्तांतरण करे पर्यंत जी प्रक्रिया असते ना ति शब्दात सांगणे देखील शक्य नाही आणि सांगून तुम्हाला ती कळणार पण नाही.
असो, आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता आमचे कर्त्तव्य जबाबदारीने पार पाडतोय. यात आमची आणि आमच्या परिवाराची काय हानी होतेय ते फक्त आम्हालाच माहित. तुम्ही करा तुमचे काम. उद्या अजून काहीतरी न्यूज तयार ठेवा; पण तरीही आम्ही न डगमगता आमचे कर्तव्य करण्यास सक्षमच असणार…
आणि ही महाराष्ट्रातील यशस्वी रुग्णालये म्हणून कालही होती, आजही आहेत आणि उद्याही असणार…
बघा जमलेच तर पोस्ट वर विचार करा आणि नाहीच जमत असेल, तर वाहयात टिप्पण्या पण करू नका..
धन्यवाद,
सीमा राजेश कांबळे
अधिपरिचरिका
लो टि म स रुग्णालय
सायन.