“धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही अ‍ॅक्शन घेतो” : संजय राऊत

मुंबई, ४ सप्टेंबर २०२०: बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी” असं विधान कंगनाने केलं होतं. यावरून मुंबई पोलीस, संजय राऊत आणि कंगना यांच्यामध्ये ट्विटरवर जणू युद्धच सुरू झालं आहे. सुशांत मृत्यू प्रकरणी सध्या ठाकरे सरकार व मुंबई पोलीस पक्षांच्या व सेलिब्रिटींच्या निशाणावर असल्याचं दिसत आहे. सध्या यातील कंगना व संजय राऊत यांचे ट्विटरवरील युद्ध चांगलेच चर्चेत आहे.
काल कंगनाने राऊत यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून खोचक टीका केली होती. याला राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या सहन करणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. “ही मुंबई १०६ हुतात्मांनी मिळवली आहे. या मुंबईचं रक्षण आमच्या पोलिसांनी केलं आहे. २६/११ हल्ला मुंबई पोलिसांनी परतवला, कसाबला याच पोलिसांनी पकडलं, अशा या मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी” असे राऊत म्हणाले.
“मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी” अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनावर हल्लाबोल केला.

राम कदमांवर वक्तव्य

“मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्यांना पाठीशी घालणारे जे कोणी आहेत, त्यांना मुंबईत मतं मागताना लाज वाटली पाहिजे, तुम्हाला पीओकेने मतं दिली का?” असा सवाल संजय राऊत यांनी भाजप आमदार राम कदम यांना विचारला.
“राम कदमांनी कंगना रनौतची तुलना झाशीच्या राणीशी करणं हा सर्वात मोठा अपमान आहे.  झाशीची राणी ही महाराष्ट्राची वीरकन्या, महाराष्ट्राच्या अस्मितेवर गुळण्या टाकणाऱ्या कोणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल, आणि राजकीय पक्ष झाशीच्या राणीचा अपमान करणार असेल, तर राजकारण किती तळाला नेलंय हे स्पष्ट दिसतंय” असेही संजय राऊत म्हणाले.
“धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करतात आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा