मी मंत्रिमंडळ विस्ताराची न्यूज आता पाहत नाही, बच्चू कडू यांचे संतापाने विधान

नागपूर, २ ऑगस्ट २०२३ : मागील वर्षभरापासून वेळोवेळी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र अजूनही विस्तार होत नाही.मंत्रिमंडळ विस्ताराकडे सत्ताधारी भाजप,शिवसेनेचे अनेक आमदार डोळे लावून बसलेआहेत. त्याचबरोबर शिंदे गट आणि भाजपचे मित्र पक्षही या विस्ताराची वाट पाहत आहेत. ज्या ज्या वेळी विस्ताराची चर्चा सुरू होते, त्या त्या वेळी या इच्छुकांकडून मोर्चेबांधणी केली गेली. पण प्रत्येकवेळी मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला गेला. अजित पवारांसह राष्ट्रवादीचा एक गट सरकारसोबत आला आणि सत्तेत सहभागीही झाला. पण इच्छुकांना अजून सत्तेची दारे उघडली नाहीत. त्यामुळे अनेकजण वैतागले आहेत. प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडूही विस्तार होत नसल्याने उद्विग्न झाले आहेत.

मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल हे मला माहीत नाही. मी विस्ताराची न्यूज आता पाहत नाही, असा संताप बच्चू कडू यांनी व्यक्त केला. प्रहारने मंत्रीपदाची मागणी केली आहे. पण मी मंत्रिपद घेणार नाही. राजकुमारसाठी मंत्रिपद ठेवणार आहे, असेही बच्चू कडू यांनी सांगितले. यावेळी बच्चू कडू यांनी संभाजी भिडे यांच्या विधानाचा निषेध नोंदवला. कुठल्याही महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणे योग्य नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल विधान करताना पुरावे दिले होते. भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल जे विधान केले ते निंदनीय आहे. कोणीही असू द्या, भिडे गुरुजी असो की कुणी असे बोलले तर त्यांना आडवे घेतले पाहिजे. भिडे गुरुजी स्वातंत्र्याबद्दल संशय निर्माण करत आहेत, स्वातंत्र्याबाबतचे त्यांचे मत चुकीचे आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

निधी वाटपात भेदभाव झाला असा काँग्रेस आरोप करते. यावर काँग्रेसची सत्ता होती तेव्हा काय होते? तेव्हाही तसेच होत होते. जशी करणी तसे फळ मिळत असते, असा टोला त्यांनी लगावला. प्रश्न सोडवायला केवळ अधिवेशनंच मार्ग नाही. कॅबिनेटही असते. सरकार रोज प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असते, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा