रत्नागिरी, २८ ऑगस्ट २०२१: भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यातील राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत नारायण राणे यांनी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर राणेंना झालेली अटक आणि सुटका, या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. हे शांत होतं ना होतं नारायण राणे यांनी काल पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.
नारायण राणे यांनी आपल्या जन आशिर्वाद यात्रेदरम्यान काल रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “घरात आणि पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री आपण पहिल्यांदाच पाहिला. वर्षावर जाऊन गप्पा मारत बसतात, असे म्हणत, केस केल्यामुळे राणे घाबरून जाईल असे वाटत असेल, मात्र, मी घाबरणारा नाही. ते रक्तातच नाही,” असे राणे यावेळी म्हणाले.
सुशांतसिंह राजपूत प्रकरण अद्याप संपलेलं नाही
याच वेळी राणे यांनी काही जुन्या प्रकरणांनाही हात घातला.सुशांतसिह राजपूतची हत्या आणि दिशा सालियानची बलात्कार करुन हत्या झाली. त्याचे आरोपी मिळाले नाही. नारायण राणेच्या पाठीमागे लागू नका. नाहीतर मी आता थोडं बोलतोय. नाहीतर सगळं बोलावं लागेल ते परवडणारं नाही, अशा शब्दात राणेंनी शिवसेनेला एकप्रकारे दम भरलाय. मी कुठलाही गुन्हा केला नाही. आपण सत्तेत आहोत, ती सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. काही हरकत नाही. आम्ही काही कायम विरोधी पक्षात राहण्यासाठी आलो नाही. भविष्यात आम्हीही सत्तेत येऊ. त्यामुळे अधिकारी, पोलिसांनी कायद्यात राहून काम करावं. कायद्याच्या बाहेर जाऊन काम कराल तर तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा राणेंनी अधिकारी आणि पोलिसांना दिला आहे.
दोन वर्षांत कोकणाला काय दिलं ?
-महाविकास आघाडी सरकार येऊन जवळपास २ वर्षे झाली आहेत. या २ वर्षांत कोकणाला काय दिले? असा सवालही राणेंनी केला. दादागिरी करू नका, माझ्या वाट्याला जाऊ नका, असा इरा देत, आम्ही घरात बसून राहत नाही. लोकांमध्ये मिसळून, त्यांच्याशी संवाद साधून कामे करतो, अशा शब्दांत राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे