पुरंदर, २१ जानेवारी २०२१: नीरा ग्राम पंचायत निवडणुकी मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक चार मधून ग्रामपंचायत निवडणूक लढवली. माजी बांधकाम सभापती ग्रामपंचायतीच्या रिंगणात उतरले असल्याने या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.याबाबत प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी जनतेनं दिलेला कौल मी आदर पूर्वक स्वीकारतो असे म्हटले आहे.
नीरा गावाचे एकेकाळचे माजी उपसरपंच तसेच जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती राहिलेले दत्ताजीराव चव्हाण हे २५ वर्षानंतर पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे गेले. मात्र, यामध्ये त्यांना यश आले नाही. आज पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “जनतेने जो कौल दिला आहे तो मला मान्य आहे आणि तो मी आदरपूर्वक स्वीकारतो.”
आपल्या पराभवा बद्दल बोलताना ते म्हणाले की, “ग्रामपंचायत सोडून जिल्हा परिषदेवर काम करीत असताना किंवा पक्षाच्या पदावर काम करीत असताना आपल्याच गावातील लोकांना अपेक्षित वेळ देता आला नाही. लोकांच्या आपेक्षा वाढल्या होत्या. पण, गेली १५ वर्ष मी कोणत्याही निवडणुकीला सामोरे गेलो नव्हतो. त्याकाळात असलेले मतदार व आताच्या आसलेल्या मतदारांमध्ये मोठा फरक आहे. आता तरुण मतदारांची संख्या मोठी आहे. त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. त्याच बरोबर आता निरेत बाहेर गावाहून आलेल्या मतदारांची संख्या मोठी आहे. त्यांच्याशी आमचा संपर्क नेहमीच कमी राहिला.
” वार्डातील मतदारांपुढे जाण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. तरी या ठिकाणी लोकांनी मला चांगली मते दिली. मी त्यांचे आभार मानतो.तसेच आता ग्रामपंचायती मध्ये निवडून आलेल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो.जय पराजय काय होताच राहतात. मात्र, जनतेची कामे करण्याचा वसा आम्ही घेतला आहे. तो मी कधीही सोडणार नाही.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे