मुंबई, ६ जुलै २०२३ : अजित पवार युतीत सहभागी झाल्यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. अजित पवार युतीत सामील झाल्यामुळे शिंदे गटाची मोठी अडचण झाली आहे. अजित पवार सुद्धा ४० आमदारांना घेऊन भाजपसोबत आले आहेत. शिवाय शरद पवार यांच्या सारख्या बलाढ्य नेत्याला मात देऊन ते भाजपसोबत आले आहेत. त्यामुळे अजितदादा मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले आहे. मी राजीनामा देणार नाही. सोबत आलेल्या ५० आमदारांना निराश करणार नाही, असे वक्तव्य शिंदे यांनी केले आहे
अजित पवार यांची युतीत एन्ट्री झाल्यानंतर सर्वाधिक कोंडी शिंदे गटाची झाली आहे. शिंदे गटाला विचारात न घेता भाजपने अजित पवार यांना सोबत घेतल्याचे सांगितले जात आहे. ज्या अजित पवार यांच्यावर आरोप करून शिवसेना सोडली, त्याच अजित पवार यांच्या नेतृत्वात शिंदे गटाला काम करावे लागत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला वटवृक्ष तुम्ही तोडलात का? असा सवाल आता शिवसैनिक शिंदे गटाला विचारण्याची शक्यता आहे. अजित पवारांचा गट सोबत आल्याने शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाल्याने काल मुख्यमंत्र्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीत अनेकांनी आपली नाराजी बोलून दाखवल्याचे सांगितले जात आहे.
आमदारांची ही नाराजी असतानाच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या चर्चा इतक्या सुरू झाल्या की स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यावर खुलासा करावा लागला आहे. मी राजीनामा देत नाहीये. या बातम्या कोण पसरवत आहे हे मला चांगले माहीत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.मी राजीनामा देणार नाही. मी ५० आमदारांना निराश करणार नाही. या आमदारांनी संकट काळात मला साथ दिली आहे. त्यामुळे मी त्यांना कधीच निराश करणार नाही, असे शिंदे यांनी आमदारांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
२०२४ मध्ये मीच मुख्यमंत्री होणार आहे. अजितदादा पवार आपल्यासोबत आल्याने चिंता करण्याचे कारण नाही. कारण मुख्यमंत्रीपद अजूनही माझ्याकडे आहे. आणि सरकारवर माझाच कंट्रोल आहे. अजित पवार यांना सरकारमध्ये घेणे हा राजकीय प्रक्रियेचा एक भाग आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वगळून ही युती झाली आहे. इथे घराणेशाहीला थारा नाही, असे शिंदे म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर