आयसीसी विश्वचषकाचे नवे वेळापत्रक आज होणार जाहीर, भारत-पाक सामन्याव्यतिरिक्त या ६ सामन्यांच्या तारखा बदलणार

नवी दिल्ली, २ ऑगस्ट २०२३ : यावर्षी भारतात एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे आयोजन केले जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ हा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्याचा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पण, आता या वेळापत्रकात बदल झाल्याची बातमी समोर येत आहे. पहिल्या वेळापत्रकानुसार, भारत आणि पाकिस्तान (भारत विरुद्ध पाकिस्तान) यांच्यातील सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या मैदानावर होणार होता. पण, आता या सामन्याची तारीख बदलली आहे.

भारत-पाकिस्तानसह ६ सामन्यांमध्ये बदल करून विश्वचषकाचे नवे वेळापत्रक आज जाहीर केले जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रीमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता १५ ऐवजी १४ ऑक्टोबरला होणार आहे. तसेच, १२ ऑक्टोबरला होणारा श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १२ ऐवजी १० ऑक्टोबरला हैदराबादमध्ये खेळवला जाईल.

हैदराबादमध्ये ९ ऑक्टोबरला होणारा न्यूझीलंड आणि नेदरलँड यांच्यातील सामना आता १२ ऑक्टोबरला होऊ शकतो. १४ ऑक्टोबरला दुपारी दिल्लीत होणारा इंग्लंड-अफगाणिस्तान सामना सकाळी होणार आहे. याच दिवशी न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार होता. पण, आता तो सामना १५ ऑक्टोबरला हलवला जाऊ शकतो. याशिवाय ९ ऑक्टोबरलाही सामना होण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा