आगामी काळात भाजपने आमचा विचार केला नाही तर भाजपची साथ सोडू, महादेव जानकर यांचे वक्तव्य

पंढरपूर, १० जुलै २०२३ : २०१४ मध्ये युतीचे सरकार आले त्यावेळी विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, आरपीआय आठवले गट हे पक्ष भारतीय जनता पार्टी बरोबर युतीमध्ये सहभागी होते. या सर्वांनाच सत्तेच्या काळात सत्तेत सहभागी करून घेण्यात आले होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीनंतर हे पक्ष दुर्लक्षित झाल्याचे दिसून येत आहे. यापैकी आरपीआय गटाचे नेते रामदास आठवले हे आता केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहेत.

मागील काही दिवसापासून युतितील मित्र पक्षांनी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्याने प्रहारचे बच्चू कडू, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत आणि आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी थेट आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर जानकरv यांनी गेल्या महिन्यातच आम्हाला लोकसभेसह विधानसभेच्या जागा द्या अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असे म्हटले होते.

आता देखील जानकर यांनी थेट भाजपला इशारा दिला आहे. आगामी काळात भाजपने जर आमचा विचार केला नाही,तर आम्ही भाजपची साथ सोडू. तसेच लोकसभेला ४८ जागा लढू असा निर्धार बोलून दाखवला आहे. याच बरोबर त्यांनी भाजपवर किती दिवस अवलंबून राहायचे म्हणत आपला पक्ष वाढवण्याची गरज आहे. त्यामुळेच जनस्वराज्य यात्रेचा शुभारंभ करत असल्याचे ते म्हणाले. ही जनस्वराज्य यात्रा लोकसभेच्या ४८ मतदारसंघातून जाईल अशीही घोषणा महादेव जानकर यांनी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा