अट मान्य केल्यास भाजप मध्ये प्रवेश करू – बच्चू कडु

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२०: शेतकर्‍यांना ५० टक्के नफा धरून भाव देऊ व याच भावात शेतकर्‍यांचा शेतमाल खरेदी करू, असे कृषी विधेयकांमध्ये नरेंद्र मोदींनी नमूद करावे, या अटीवर आम्ही भाजपमध्ये प्रवेश करु असे बच्चू कडू यांनी जाहीरपणे सांगितले आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध केला असून कृषी विधेयकावर बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बच्चू कडू म्हणाले की, हे बिल जसेच्या तसे आम्ही स्वीकारायला तयार आहोत. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे नेहमी ५७ इंच छाती असल्याचे सांगतात त्याप्रमाणे त्यांनी वरील दोन ओळी विधेयकात टाकावे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमन मुक्ती विधेयक आणि करार शेती विधेयक अशी ही तीन नवीन विधेयके केंद्र सरकारने मांडली असून ही विधेयके लोकसभेत मांडताना कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकर्‍यांचा या कायद्यांमुळे फायदा होईल, असे म्हटले आहे. पण शेतकर्‍यांकडून या कृषी विषयक विधेयकांवरून केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन देखील करण्यात येत आहे.

कामगार तसेच कृषी सुधारणा विधेयक शेतकर्‍यांच्या हिताचे नसल्याचे म्हणत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील विरोध केला आहे. तसेच महाराष्ट्रात संसदेने मंजूर केलेल्या कृषी आणि कामगार विधेयकांची अंमलबजावणी करण्यास आमचा विरोध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा