राज्य सरकार ऐकत नसंल, तर मराठा समाज एमपीएससी’चं केंद्र बंद करेल: छत्रपती संभाजीराजे

नवी मुंबई, ७ ऑक्टोंबर २०२०: आज नवी मुंबईमध्ये माथाडी समाजाची आणि मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते. मराठा आरक्षण कोर्टात स्थगित केल्यापासून राज्यभर मराठा समाज पुन्हा नाराज झालेला दिसला आहे, त्यात येत्या काळात एमपीएससीच्या देखील परीक्षा होणार आहेत. या परीक्षा रद्द करण्यासाठी मराठा समाजाकडून मागणी करण्यात येत आहे. त्याला अनुसरूनच ही बैठक घेण्यात आली होती. यावेळी आपल्या भाषणात खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केंद्र सरकारवर आरोप करत असं म्हटलं आहे की, केंद्र सरकार मराठा समाजाला फसवण्याचा प्रयत्न करत आहे.

काय म्हणाले आपल्या भाषणात

“केंद्र सरकार मराठा समाजाला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्य सरकार त्यांच्या हातात असणाऱ्या गोष्टी देखील का करत नाही? “सारथी संस्थाही सरकारने बुडीत घातली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारने काय दिलं? राज्य सरकारने त्याचा खेळखंडोबा केला. मराठा समाजासोबत ते किती खेळणार? मराठा समाजातील आमदारांनी सुद्धा याची जबाबदारी घ्यायला हवी,”

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या मुद्द्यावर बोलताना संभाजीराजे म्हणाले, “सिद्धार्थ शिंदे वाईचा मुलगा आहे. तो सध्या कोरोना बाधित आहे. तो कसा परीक्षा देणार? अशा विद्यार्थ्यांचं नुकसान का? परीक्षेला बसणारे २ लाख मुलं कोरोनाबधित झाली तर त्याला कोण जबाबदार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला कॉल आला होता, मी केला नव्हता. एमपीएससी परीक्षा झाली, तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. या मराठा समाजाच्या भावना आहेत.”

“सरकार परीक्षा घेण्याची घाई का करत आहे? हे षडयंत्र आहे का कळत नाही. ज्यांची वयाची मर्यादा संपेल त्यांच्यासाठी वयाची अट शिथिल करुन वय मर्यादा वाढवा. सर्वांना घेऊन चला. माझी सरकारला विनंती वजा सूचना आहे”, असंही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

“समाजानं आपापल्या वकिलांनी काय करायला हवं हे ठरवावं, आंदोलनाची दिशा ठरवावी. मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकार ऐकत नसंल, तर मराठा समाज एमपीएससी’चं केंद्र बंद करंल. अनेक लोकांचं नुकसान झालं आहे. म्हणून महाराष्ट्र बंद करणार नाही. त्यामुळं राज्य सरकारनं कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा”, असा इशारा संभाजीराजेंनी सरकारला दिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा