“जर विठ्ठलाचं मंदिर उघडलं गेलं तर कोरोना महाराष्ट्रातून पळून जाईल”….. 

पंढरपूर, ३० ऑगस्ट २०२०: सध्या पंढरपूरमध्ये वंचित बहुजन आघाडी कडून आंदोलन सुरू आहे. यातच आता सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व एसटी गाड्या बंद केल्या आहेत. एकिकडे वंचित आघाडी आणि विश्व वारकरी सेनाच्या वतीने आंदोलन सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय आंदोलनामध्ये आणखीन तेल ओतण्याचं काम करत आहे. या आदेशानुसार आज म्हणजे ३० ऑगस्टच्या रात्री बारा वाजल्यापासून ते उद्या रात्री १२ पर्यंत एसटी वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

यादरम्यान वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी असं वक्तव्य केलं आहे की, “तुम्ही कितीही मोठे बॅरिकेट लावा आम्ही आंदोलन कायमच ठेवणार आहोत.” उद्या वंचीतच्या वतीनं पंढरपूर मध्ये आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी हे बॅरिकेट लावण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर वंचितचे प्रवक्ते चंदनशिवे यांनी असं वक्तव्य केलं आहे.

मंदिराकडील सर्व रस्ते बंद करण्यासाठी दहा फुटाचे रेलिंग लावण्यात आली आहे. रस्ता बंद केल्याने चंदनशिवे व त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी ते म्हणाले की, “विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या आवारामध्ये प्रशासनाने कितीही उंच बॅरिकेट लावले तरी आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही.

आम्ही हे बॅरिकेट तोडून मंदिर प्रवेश करणार आहोत. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विश्व वारकरी सेनेनं आंदोलन पुकारलं होतं. प्रशासन करत असलेल्या सर्व गोष्टी अनुचित आहेत. आता एसटी देखील बंद करण्यात आली आहे असं समजलं आहे. आमचं आंदोलन पहिल्या दिवसापासूनच दडपण्याचं काम या प्रशासनाचं चालू आहे. येथील स्थानिक लोक व व्यापारी यांचा देखील आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आणि उद्याचं आमचं आंदोलन यशस्वी देखील होणार आहे.”

पुढे ते म्हणाले की, ” जर विठ्ठलाचे मंदिर उघडलं गेलं तर कोरोना महाराष्ट्रातून पळून जाईल. एकदा का विठ्ठलाचा दरबार उघडला तर कोरोना तुम्हाला दिसणारच नाही. आम्ही मंदिर उघडणारंच असं मी ठामपणे सांगतो.”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा