भविष्यात शिवसेना-भाजपाची युती झाली तर… हे दिलं राणेंनी उत्तर

रत्नागिरी, २८ ऑगस्ट २०२१: महाडमध्ये नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केल्यानंतर शिवसेना-भाजपा आमने-सामने आली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत नारायण राणे यांनी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर राणेंना झालेली अटक आणि सुटका, या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. नारायण राणे यांनी आपल्या जन आशिर्वाद यात्रेदरम्यान काल रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
तुम्ही शिवसेनेवर टीका करत असताना मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट होते. त्यांच्यात बंद दाराआड चर्चा होते. त्याबद्दल काय वाटतं असा प्रश्न राणेंना पत्रकारांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते भेटूच शकतात. मुख्यमंत्रीपदाइतकंच विरोधी पक्षनेतेपदही महत्त्वाचं आहे, असं उत्तर राणेंनी दिलं.
राजकारणात काही सांगता येत नाही, कोणी कोणाचा मित्र ही नसतो आणि कुणाचा कायमचा शत्रूही नसतो. भविष्यात शिवसेना-भाजपाची युती झाली तर आपली भूमिका काय असेल, या प्रश्नावर राणे म्हणाले, “जर-तर ला मी उत्तरं देत नाही. भविष्यात युती झाली तर आमचे प्रमुख नेते जे बोलतील ते मला मान्य असेल”
पिंजऱ्यात राहून कोणी सत्ता चालवली नाही…
यावेळी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली. घरात राहून, पिंजऱ्यात राहून कोणी सत्ता चालवली नाही, असे राणे म्हणाले. तसेच संजय राऊत आणि विनायक राऊत हे शिवसेनेला बुडवतील, असे राणे म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा