चर्चा करायची असेल तर या, १९६२ पासून ते आतापर्यंतची करू : अमित शहा

नवी दिल्ली, दि. २८ जून २०२०: एकीकडे चीनबरोबर तणाव सुरू असतानाच दुसरीकडे या विषयावर भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार अरोप प्रत्यारोपाची लढाई सुरू आहे. लडाखमधील एलएसीवरील गलवान खोऱ्यात चीनबरोबर झालेल्या चकमकीत २० भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर राजकारणही जोरात सुरू आहे.

गलवान खोऱ्यातील चकमकीनंतर देशभरातून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती. या दरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला सातत्याने प्रश्न विचारले. भाजपवर आपली प्रतिक्रिया देत राहुल गांधी यांनी चक्क ‘सुरेंद्र मोदी’ असे देखील आपल्या ट्विटमध्ये म्हटले. यावर प्रतिक्रिया देत अमित शहा म्हणाले की, “जर आपल्याला चर्चा करायची असेल तर संसद भरणार आहे आपण यावे आणि यावर चर्चा करावी. चर्चा करण्यासाठी मी तयार आहे. १९६२ पासून ते आत्तापर्यंतच्या सर्व गोष्टींवर आपण सविस्तर चर्चा करू.”

वृत्तसंस्था ए एन आय ला मुलाखत देत असताना अमित शहा यांनी सांगितले की, “जर चर्चा करायची असेल तर चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. चर्चा करण्यासाठी कोणीही घाबरत नाही, परंतु देशाचे सैनिक सीमेवर आपल्या प्राणांची आहुती देत आहेत आणि सरकार देखील सध्यस्थिती वर पूर्ण कार्यक्षमतेने कार्य करत असताना शेजारील देश पाकिस्तान आणि चीन खुश होईल असे कोणत्याही प्रकारचे वर्तन राहुल गांधी यांनी करू नये.”

कोरोना आणि लडाखच्या गलवान खो-यामध्ये चीनशी झालेल्या तणावाच्या प्रश्नावर अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत दोन्ही युद्धे जिंकणार आहे. गृहमंत्री म्हणाले की कोरोनाविरूद्ध भारत सरकारने चांगला लढा दिला आहे. मी राहुल गांधींना सल्ला देऊ शकत नाही, हे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे कार्य आहे. काही लोक ‘वक्रद्रष्टा’ असतात, त्यांना योग्य गोष्टींमध्येही चुका दिसतात. कोरोनाविरुद्ध भारताने चांगली झुंज दिली आणि आमची आकडेवारी जगापेक्षा चांगली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा