गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुण्यात लग्न करत असाल तर व्हिडिओ बनवून चौकीत देणे आवश्यक

पुण्यात लग्न करत असाल तर व्हिडिओ बनवून चौकीत देणे आवश्यक

पुणे, ७ सप्टेंबर २०२०: सध्या पुण्यातील कोरोना बाबतची स्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे. काल अजित पवार यांनी देखील हे मान्य केलं की लॉकडाऊन उठवण्यात घाई झाल्यामुळे पुण्यातील कोरोणाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. पुण्यातील वाढती रहदारी, देण्यात आलेली सवलत, तसेच मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत देण्यात आलेल्या इतर सवलती यामुळे सर्व उद्योग धंदे सुरू करण्यात आले आहेत. यासह विवाह सोहळे व इतर कार्यक्रम देखील होण्यास सुरुवात झाली आहे.       

विशेष म्हणजे विवाह सोहळ्यासाठी याआधी कार्यालय बंद ठेवण्यात आली होती. मात्र, नवीन नियमावलीत विवाहासाठी कार्यालयांमध्ये परवानगी देण्यात आली. यासह पन्नास लोकांच्या उपस्थितीला देखील परवानगी देण्यात आली होती. मात्र, पुण्यातील कोरोनाचे स्वरूप पाहता आता विवाह सोहळ्यावरती कडक नजर ठेवण्यात येणार आहे. याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

राजेश देशमुख यांनी दिलेल्या नवीन आदेशानुसार नागरिकांनी आणि मंगल कार्यालयांच्या मालकांनी कार्यक्रमस्थळी फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमावलीचे कडक अंमलबजावणी होत आहे की नाही याची खात्री करावी असं म्हटलं आहे. तसंच ५० पेक्षा अधिक पाहुण्यांना विवाह समारंभाला हजेरी लावता येणार नाही, यामध्ये स्वयंपाकी, वेटर्स आणि सांगितिक कार्यक्रम करणारे कलाकार यांचाही समावेश आहे.

त्याचबरोबर विवाह समारंभाच्या आयोजकांनी कार्यक्रमाचे व्हिडिओ चित्रिकरण करुन पुढील पाच दिवसांत ते पोलीस स्टेशनमध्ये जमा करावे. त्याचबरोबर आयोजकांना कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्यांची यादीही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनुसार बंधनकारक आहे.

काय आहेत नवीन नियम:

१) जास्तीत जास्त ५० लोकांनाच लग्न समारंभांना हजेरी लावता येईल. या लोकांना एकमेकांमध्ये ६ फुटांचं अंतर राखणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर फिजिकल डिस्टंसिंगचं योग्य प्रकारे पालन होत आहे किंवा नाही याची पाहणी करण्याचं काम दोन व्यक्तींवर सोपवण्यात यावं.

२) ५० लोकांची यादी (फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्स, सांगितिक कार्यक्रम करणारे कलाकार, निवेदक यांच्यासह) स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जमा करणे, त्याचबरोबर सर्व निमंत्रक (भटजी, वाजंत्री, वेटर्स) यांनी तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे.

३) कार्यक्रमस्थळी मद्य सेवन आणि गुटखा, पान मसाला खाण्यास परवानगी नाही. हे पदार्थ खाऊन कार्यक्रमस्थळी थुंकल्यास दंडनीय गुन्हा असेल.

४) वातानुकुलीत व्यवस्था कार्यक्रमस्थळी वापरता येणार नाही.

५) कार्यक्रमातील खुर्च्या, टेबल, किचन, जेवणाची जागा, वॉशरुम्स हे सातत्याने निर्जंतुक करण्यात यावेत.

६) जर कार्यक्रमस्थळी नियमांचा भंग झाल्याचे आढळल्यास लग्नाचा हॉल, लॉन्स किंवा इतर जागा जिथे कार्यक्रमाचे आयोजन केले असेल तो तात्काळ बंद करण्यात येईल.

७) लग्न समारंभाचे चित्रिकरण करण्यात आलेली सीडी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये कार्यक्रमानंतर पाच दिवसांच्या आत जमा करावी.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version