गोल पोस्ट इतर माहिती पुरंदरच्या मातीत जन्मलेला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक

पुरंदरच्या मातीत जन्मलेला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक

पुरंदर दि.७ सप्टेंबर २०२० :तो काळ होता अत्यंत जिकिरी होता. परकीय असलेले इंग्रज संपूर्ण भारत देश पादाक्रांत करीत होते.संपूर्ण भारतात त्यांचा एकछत्री अंमल सुरू झाला होता. पुण्याचे पेशवे सुद्धा इंग्रजांचे मांडलिक झाले होते. इंग्रजी सत्ते विरोधात भल्या भल्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या होत्या आणि आपले गुडघे इंग्रजांपुढे टेकवले होते. अशा वेळी पुरंदरच्या मातीतून क्रांतीची एक ज्योत आकार घेऊ लागली आणि पुढील १४ वर्षात या ज्योतीने मशालीचे रुप धारण करीत इंग्रजी सत्तेला नाकी नऊ आणले. ती ज्योत म्हणजे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक होय. या उमाजी राजांनी देशात सर्वात प्रथम इंग्रजी हुकूमत नाकारली आणि क्रांतीचा पहिला झेंडा पुरंदरच्या मातीत रोवला .आज या उमाजी राजांची जयंती आज साजरी केली जातेय आणि म्हणूनच आपण या आद्य क्रांतिवीरा बद्दल जाणून घेऊयात.

पुरंदर तालुक्यातील किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या भिवडी या गावात ७ सप्टेंबर १७९१ रोजी उमाजी खोमणे यांचा जन्म झाला.त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडलांचे नाव दादोजी खोमणे.नाईक ही खोमण्यांना मिळालेली पदवी आहे. पुरंदर किल्ल्याचे रक्षण करण्याची जबाबदारी या खोमण्यांवर होती आणि यातूनच त्यांना नाईक ही पदवी मिळाली आणि उमाजी खोमणे पुढे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक म्हणून ओळखले जाऊ लागले. देशाच्या इतिहासात १८५७ च्या बंडाची नोंद इंग्रजां विरुध्दचा पहिला उठाव म्हणून केली गेली आहे .परंतु या उठवापूर्वी सर्वात अगोदर उमाजीराजे नाईक यांनी इंग्रजी सत्तेला नकार देत बंडाचा पहिला झेंडा रोवला होता. तोही १८२० च्या दशकात. त्यानंतर सुमारे तीस ते पस्तीस वर्षांनी १८५७ चा उठाव झाला. पण तत्पूर्वी १८१७ ते १८३२ पर्यंत राजे उमजींनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्या काळातील एक इंग्रज अधिकारी रॉबर्ट याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला पत्र लिहिताना म्हंटले आहे की , “उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापन करू शकतो. तर त्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी टॉस म्हणतो, “उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्त्यांना फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.” हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे .जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच भारतातील काही भाग स्वतंत्र्य राहिला असता.

उमाजी हे हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरा आणि करारी बाण्याचे होते. त्यांनी पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली. त्यांनी वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३ मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यास स्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा मांडलिक म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत, त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही असा पण केला. विठुजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळसकर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्रीखंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.

उमाजी नाईक यांनी इंग्रज, सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर ते भावासारखा धावून जाऊन जात असतं इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीला सरकारने इ.स. १८१८ मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होती. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याकाळात तुरुंगात असताना ते लिहिणे वाचणे शिकले. तुरुंगातून सुटल्यावर इंग्रजांविरुद्धाच्या त्याच्या कारवाया आणखी वाढल्या. उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस याने सासवड-पुरंदरच्या मामलेदारास फर्मान सोडले. यावेळी झालेल्या लढाईत उमाजीने इंग्रज सैन्याचा पराभव करून ५ इंग्रजी सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले. उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे.त्या मुळे त्यांच्यावर चाल करणे इंग्रजी सैन्याला अवघड होत असे.

१८२४ ला उमाजीने भांबुर्डी येथील इंग्रज खजिना लुटून तो मंदिराच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्यांनी ठणकावून सांगितले की, आम्ही आपली सत्ता झुगारून देत आहोत. तुम्ही जर आमच्या लोकांवर जबरदस्तीने राज्य करणार असाल तर असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील .उमाजी फक्त इशारा देऊन थांबले नाहीत तर त्यांनी त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. २१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी डोंगरात झालेल्या चकमकीत पराभूत केले होते. गडावरून बंदुका, गोफणी चालवून अनेक सैनिकांना घायाळ करून परत पाठवले होते. यावेळी त्यांनी अनेक इंग्रजी सैनिकांना यमसदनी पाठवले होते.

उमाजी राजेंनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून उमाजीने एकप्रकारे स्वतंत्र सरकारच निर्माण केले होते. त्यांनी जेजुरीच्या गडावर राज्याभिषेक ही करवून घेतला होता. तेंव्हापासून उमाजी जनतेचे राजे बनले. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी सावकार, वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात केले. त्यातच एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून उमाजीने हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला. इंग्रजांनी उमाजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि २०० एकर जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच उमाजींचे दोन साथीदार फितूर झाले व या दोघांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.

१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीना इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील त्यांना ठेवण्यात आले. या कैदेत असताना त्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजींवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. या नरवीर उमाजीराजास न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारा पहिला क्रांतिकारक उमाजी नाईक ३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी हसत हसत फासावर चढला. इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजीचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांनाही फाशी दिली.

अशा या उमाजी राजेंचा आज जन्मदिवस आहे.इंग्रजां विरोधात पाहिले बंड पुकरणा-या आद्य क्रांतिकारकास मानाचा मुजरा .

न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version