काही पथ्ये पाळली, तर सोशल मीडिया फायद्याचेच ः सप्तर्षी माळी

7

नागपूर, ता. २० डिसेंबर २०२२ ः सोशल मीडिया वापरताना कुठलाही अतिरेक न करता, काही पथ्ये पाळली तर त्यापासून अनेक फायदे होऊ शकतात, असे मत प्रसिद्ध कथाकार सप्तर्षी माळी यांनी व्यक्त केले. ‘आनंदासाठी जन्म आपुला’ या समूहाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

‘आनंदासाठी जन्म आपुला’ समूहाचा मासिक तृतीय आभासी कार्यक्रम नुकताच झाला. त्यात ‘सोशल मीडिया : एक चक्रव्यूह’ या विषयावर चर्चात्मक कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुण्या म्हणून विनया फडणवीस होत्या. विषयाची संकल्पना सौ. वर्षा विजय देशपांडे यांची होती.
जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचे सामाजिक विषय या कार्यक्रमाद्वारे लोकाभिमुख करणे हा या समूहाचा उद्देश असून, त्यावर होणारी समूहातील सदस्यांची साधक-बाधक चर्चासुद्धा विचारप्रवर्तक असते.

कार्यक्रमाचे संयोजक मो. बा. देशपांडे आणि संयोजिका वर्षा देशपांडे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सप्तर्षी माळी यांनी आपल्या जीवनातले सोशल मीडियाबद्दलचे चांगले- वाईट अनुभव कथन केले. ते म्हणाले, की सोशल मीडियाचा चांगला उपयोग केला तर फायदे आहेत आणि अतिरेक केला तर तोटे आहेत. प्रमुख पाहुण्या विनया फडणवीस म्हणाल्या, की फेसबुक, व्हॉट्सॲप यात आपण जरूर अडकत चाललो आहे, हे खरे असले तरी प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा उपयोग कसा करायचा, हे आपणच ठरवायला पाहिजे. समूहाच्या मान्यवर सदस्यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. त्यात प्रामुख्याने निर्मला गांधी, जया रोहनकर, माया जयस्वाल, विद्या करपटे, डॉ. वसुधा पांडे, अरुण देशपांडे, मनीषा लिमये, विजया पाध्ये, स्मिता देशपांडे, मंजूषा परतेकर, अनघा येनारकर, प्रेरणा वाडी यांचा सहभाग होता.

सुषमा मुलमुले यांनी आभार मानले. मनश्री देशपांडे हिच्या पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा