हिंमत असेल तर जेलमध्ये टाकून दाखवाच – आमदार राजन साळवी

11

रत्नागिरी, ५ डिसेंबर २०२२ : मला धमकी देण्याचा प्रयत्न करू नये. लाचलुचपत विभागाकडून चौकशीची नोटीस आलीय. त्याला मी सामोरा जाणार आहे. मी स्वच्छ आहे, त्यामुळं अशा स्वरूपाच्या धमक्यांना घाबरत नाही. हिंमत असेल तर जेलमध्ये टाकून दाखवा, संपूर्ण शिवसेना माझ्या पाठीशी आहे, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी दिला. मी पंधरा दिवसांची मुदतवाढ मागितलीय. ती दिली नाही तर मला अटक करून न्यावी, असंही त्यांनी सांगितलं.

रत्नागिरीतील आठवडे बाजार येथील शिवसेनेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, गेली अनेक वर्षे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करीत आहे. २० जूननंतर शिवसेनेत राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मी निष्ठावंत राहिलो. म्हणून ‌’एसीबी’ची नोटीस प्राप्त झालीय. ही चौकशी करणार आणि पुढील निर्णय होणार. देशात, राज्यातील सरकारकडून विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय आणि राज्य यंत्रणांच्या माध्यमातून दबाव टाकला जातोय. त्यामुळंच मला नोटीस मिळालीय. माझ्या मालमत्तेची चौकशी केली तरीही काहीच हरकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी पाठीवर थाप मारल्यामुळे जी निष्ठावंतांची श्रीमंती आमच्याकडं आहे. शिवसैनिक हीच आमची संपत्ती आहे. वडापाव खाऊन आम्ही शिवसेना वाढवली ती चूक केली. जनतेच्या हितासाठी तुरुंगवास भोगलाय, जेलमध्ये राहिलो तरीही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच सोबत आम्ही राहणार आहोत. ‘एसीबी’च्या नोटिशीमधील प्रकरण काय हे मला माहिती नाही. न्यायव्यस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. काहीही परिस्थिती ओढवली तरीही शिंदे गटात जाणार नाही, अशा शब्दांत ठणकावलं.

आमदार साळवी म्हणाले की, माझा आत्मविश्वास ठाम आहे. कुठल्या यंत्रणेला मी घाबरत नाही. ‘एसीबी’ची नोटीस प्राप्त झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. त्यांनी पाठीशी राहण्याचं आश्वासन दिलं असून, शिवसेना पाठीशी राहील. शिवसेनेत मी माझ्या पायावर ठामपणं उभा आहे. माझं उत्पन्न, खर्च आणि मालमत्ता खर्चांसंदर्भात जबाब नोंदवायला बोलावलंय. मी पंधरा दिवसांची मुदतवाढ मागितलीय. मुदतवाढ दिली नाही तर मला अटक करून न्यावी. माझ्याविरुद्ध कुणी एका व्यक्तीनं तक्रार दिलीय. राज्य सरकारच्या अधिपत्याखालच्या एजन्सीच्या माध्यमातून नोटीस आलीय. प्रसंगी जेलमध्ये जाईन, मरेपर्यंत जेलमध्ये राहायची माझी तयारी आहे; पण पायाशी जाणार नाही. हिंमत असेल तर गुन्हा दाखल करून दाखवा, ही लढाई मी लढणार आहे. मी पळून जाणार नाही. शिवसेनेचे ४० वर्षे काम करतोय, मरेपर्यंत उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक राहीन.
रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षाची भूमिका जनतेसोबत आहे. खासदारांची भूमिका वेगळी असू शकते. बारसू-गोवळ येथील चाळीस टक्के लोकांचा पाठिंबा आहे. तिथे जेटी होणार असून, लोकांनी पाठिंबा दिला आहे. ९० टक्के जनता रिफायनरीच्या बाजूने आहे. माझ्या मतदारसंघात रिफायनरी प्रकल्प यावा, ही माझी भूमिका असून जनतेला प्रकल्प हवा आहे, असा पुनरुच्चार आमदार साळवी यांनी केलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : जमीर खलफे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा