चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या कारचा फोटो पाठवल्यास मिळणार 500 रुपये, जाणून घ्या काय आहे गडकरींचा प्लॅन

नवी दिल्ली, 17 जून 2022: चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवणाऱ्याला 500 रुपये देणार असा कायदा केंद्र सरकार आणणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली. गडकरी म्हणाले की, रस्त्यावर ठिकठिकाणी वाहनं उभी असतात, त्यामुळं चालणं कठीण होतं. विशेषतः दिल्लीत ही समस्या अधिक आहे.

काय म्हणाले गडकरी?

नितीन गडकरी म्हणाले की, केंद्र सरकार लवकरच एक कायदा आणणार आहे, एखाद्या व्यक्तीने रस्त्यावर आपली गाडी चुकीच्या ठिकाणी पार्क केली असंल तर अश्या स्थितीत कोणीही त्या गाडीचा फोटो काढून पाठवू शकतो. जर समजा वाहन मालकाला 1000 रुपये दंड ठोठावला असेल, तर पाठवणाऱ्याला 500 रुपये दिले जातील. त्यामुळं पार्किंगचा प्रश्न सुटणार आहे. गडकरी म्हणाले की, लोक घरे मोठी करतात पण पार्किंग बांधत नाहीत.

केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या घराचे उदाहरण दिलं

गडकरींनी त्यांच्या घराचं उदाहरण देताना सांगितले की, त्यांच्या नागपुरातील घरी स्वयंपाकासाठी येणाऱ्या महीलेकडं देखील दोन सेकंड हँड गाड्या आहेत. पूर्वी अमेरिकेत असं व्हायचं, जेव्हा एखादी महिला साफसफाई करायला यायची, तेव्हा तिच्याकडं गाडी असायची, या गोष्टीचं आपल्याला आश्चर्य वाटायचं, आता इथंही तेच होत आहे. आपल्या घराचा उल्लेख करून गडकरी म्हणाले की, नागपूरच्या घरात 12 वाहनांसाठी पार्किंग केलीय. मी माझी गाडी रस्त्यावर पार्क करत नाही. भारतात एका कुटुंबात चार लोक आणि सहा वाहनं आहेत. दिल्लीचं उदाहरण देताना ते म्हणाले की, दिल्लीचे लोक नशीबवान आहेत कारण त्यांच्या गाडीच्या पार्किंगसाठी आम्ही रस्ता बनवला आहे. कोणी पार्किंग करत नाही, प्रत्येकजण आपली गाडी रस्त्यावर पार्क करतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा