गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा केशकर्तनालय व्यवसाय सुरु केल्यास गुन्हा दाखल करणार, तेजस्वी सातपुते

केशकर्तनालय व्यवसाय सुरु केल्यास गुन्हा दाखल करणार, तेजस्वी सातपुते

सातारा, दि. २८ एप्रिल २०२० : संचारबंदी कालावधीत केशकर्तनाचा व्यवसाय करू नये. तसेच केशकर्तकाला घरी बोलवणाऱ्या व्यक्तीसही कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्व स्तरांवर मोठया प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने शासनाने व जिल्हा प्रशासनाने अनेक प्रतिबंधात्मक आदेश पारीत केले आहेत. यानुसार जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाने या कालावधीत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तु वितरण वगळता सर्व आस्थापनांवर बंदी घालण्यात आली आहे. यानुसार केशकर्तनालय सुरू करण्यास बंदी असून त्याचा कोणत्याही व्यक्तीने भंग केल्यास संबंधीतावर भारतीय दंड सहिंता चे कलम १८८, २६९ व २७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. कोणत्याही व्यक्तीने बंदी आदेशाचा भंग करून केशकर्तनालय दुकान सुरू करू नये.
तसेच संचारबंदी (लॉकडाऊन) कालावधीत शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही व्यक्तिच्या सांगण्यावरून अथवा विनंतीवरून त्यांच्या घरी जाऊन केशकर्तनाचा व्यवसाय करू नये, अन्यथा संबंधित व्यक्तीस तसेच केशकर्तनाला घरी बोलवणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एका पत्रकान्वये विजय बाबाजी सपकाळ, सातारा जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांना कळविले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version