आपली शिवसेना आता सेक्युलर, मर्द असाल तर सांगून टाका, नितेश राणेंची शिवसेनेवर टीका

मुंबई, १ डिसेंबर २०२०: अहो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल तर सांगून टाका की तुमच्या विभाग प्रमुखाला आपली शिवसेना आता ‘सेक्युलर’ झालीये. अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लिम समाजातील लहान मुलांना नमाजाची गोडी लागावी म्हणून अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या शिवसेनेने अजान स्पर्धेचं आयोजन केल्याने सोमवार सकाळपासूनच भाजप कडून शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे.

अहो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल तर सांगून टाका की तुमच्या विभाग प्रमुखाला आपली शिवसेना आता ‘सेक्युलर’ झालीये. नाहीतर ‘हो मी नामर्द आहे’ असं तरी?, अशा शब्दात नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

याच विषयावरून यापूर्वी प्रवीण दरेकर यांनी देखील टीका केली होती. अजान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर थेट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचं उदाहरण देत शिवसेनेला आता बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा विसर पडला आहे असा आरोप दरेकर यांनी केला होता. तर ओवेसींनाही लाजवेल अशी भूमिका आता शिवसेनेने घेतली आहे अशी टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

पांडुरंग सकपाळ यांचं प्रतिउत्तर

राजकारण करणाऱ्यांना राजकारण करायचंच असतं. आम्ही कोणताही शब्द वापरला तरी ते राजकारण करतात. हिंदू-मुस्लिमांवर राजकारण करण्याची त्यांची जुनीच सवय. ही सवय जाणार नाही, असं सांगतानाच आमचा हेतू शुद्ध आहे. त्यामुळे आम्ही त्याकडे लक्ष देत नाही, असं सकपाळ म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा