लोणी काळभोर, दि.०४ सप्टेंबर २०२०: एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, लोणी काळभोर आणि टेरे पॉलिस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हॅकेथॉन – ५९ आत्मनिर्भर भारत स्पर्धेचे वेगवेगळ्या विभागातील १ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक आयआयटी रुर्की, जेएसपीएम, व्हीआयटी वेल्होर, बीटस् पिलानी, एमआयटी एडीटी विद्यापीठींनी जिंकले आहे.
आयआयटी रुर्कीचे अविरल जैन, ईशान रावत, महक गुप्ता, श्रेया शर्मा, स्तुती लिलानी आणि सुप्रतिक दास, बिटस् पिलानीचे अंशुमन सिंग, आकाश झा, अभिजित स्वाइन, वहीब साबिर कापडी आणि अश्वनी कोत्तापल्ली, जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, जेएसपीएम पुणेचे चिन्मय पारधीकर, तेजस आंबेकर, महेश गव्हाणे, चैतन्य अभंग आणि दीपक पवार, चेन्नईतील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व्हीआयटी चे जयीत साहा आणि इशिता दासगुप्ता, एसआरएम विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेचे शाहिल इस्लाम आणि विधांत मट्टा, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, पुण्याचे राम सुतार आणि कुंज शाह, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सृष्टी दळवी आणि ज्योती देशमाने या विद्यार्थ्यांनी हॅकेथॉन – ५९ आत्मनिर्भर भारत स्पर्धेच्या वेगवेगळ्या विभागातील १ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले.
हॅकेथॉन – ५९ स्पर्धेच्या नुकत्याच झालेल्या समारोप कार्यक्रमात सहभागी व्हीआयटी विद्यापीठ वेल्लोरचे कुलपती डॉ. जी. विश्वनाथन, अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक रामानन रामनाथन, एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणेचे कार्याध्यक्ष आणि प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ मंगेश कराड आणि टेरे पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे व्हर्च्युअल माध्यमातून वितरण करण्यात आले.
यावेळी डॉ. रेखा सुगंधी, पंकज शर्मा, डॉ. मोहित दुबे, डॉ. रजनीशकौर सचदेव, डॉ. आर. व्ही. पुजेरी, डॉ. किशोर रवांदे, डॉ. वीरेंद्र भोजवानी, डॉ राहुल मोरे आदी उपस्थित होते.
१ लाख रुपयांचे १३ आणि ५० हजार रुपयांचे ७ पारितोषिकांची घोषणा यावेळी करण्यात आली, भारत सरकारतर्फे चीनच्या ५९ ॲप्सवर बंदी घातली होती. या ॲपला भारतीय पर्याय म्हणून राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन -५९ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा अंतिम राऊंड ९ ते १८ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आला. यात सोशल ॲपलिकेशन्स, बिझिनेस ॲपलिकेशन्स, हेल्थ, ई-लर्निंग इत्यादी विभागात देशभरातून २१ राज्यांतील ३७७ संघांनी यात भाग घेतला होता. यातील १३३ संघाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती.
यातून ८१ संघांनी आयटी – आधारित सोल्यूशन्स प्रकारात आपले ॲप सादर केले. यासाठी उद्योग – क्षेत्रातील २० मार्गदर्शक आणि १८ ज्युरीनी काम पाहिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे