वरिष्ठांच्या धमक्यांना कंटाळून IIT-मुंबईच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या, ३६ दिवसांनी सुसाईड नोट उघड

मुंबई, २८ मार्च २०२३: १२ फेब्रुवारी २०२३ रोजी आयआयटी मुंबईच्या एका विद्यार्थ्याने कॅंपसच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी सोमवारी पोलिसांनी मोठा खुलासा केलाय. मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सांगितलं की, आत्महत्या केलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडलीय. या चिठ्ठीत सोलंकी यांनी विद्यार्थ्याचा छळ केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप केलाय.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा टीमने खोलीची झडती घेतली त्यानंतरच ही सुसाईड नोट सापडली. याप्रकरणी पोलिसांना व्हॉट्सअॅप चॅटही मिळाली आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केलीय.

तपासात सामील असलेल्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, सुरुवातीला असं मानलं जात होतं की त्याने सेमिस्टरमधील खराब कामगिरीमुळं आत्महत्या केली असावी. मात्र, सुसाईड नोट मिळाल्यानंतर त्याच्याच सहकारी विद्यार्थ्यांकडून त्याचा छळ होत असल्याचं दिसून आलं. सोलंकी यांना जातीय भेदभावाचा सामना करावा लागला होता की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

या प्रकरणाचा तपास एसआयटी गुन्हे शाखेकडं सोपवण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सहआयुक्त पोलिस (गुन्हे) लखमी गौतम यांच पथक करणार आहे. आदर्श सोळंकी या विद्यार्थ्याने गेल्या महिन्यात वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी जातीवाचक शेरेबाजी आणि छळ केल्याचा आरोप केलाय. आयआयटी-मुंबईमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तीन महिन्यांतच विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. हा खून झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला. तेव्हापासून पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा