मुंबई, ७ मार्च २०२३ : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मुंबईचा विद्यार्थी दर्शन सोलंकी याच्या गेल्या महिन्यात झालेल्या मृत्यूनंतर संस्थेने स्थापन केलेल्या चौकशी समितीने जाती-आधारित भेदभाव नाकारला आहे; तसेच समितीने सूचित केले आहे की, दर्शन सोलंकी याच्या कथित आत्महत्येचे कारण खराब शैक्षणिक कामगिरी असू शकते.
मूळचा अहमदाबादचा, १८ वर्षीय सोलंकी, जो बी.टेक. (केमिकल) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. त्याचा १२ फेब्रुवारी रोजी पवई येथील कॅम्पसमधील वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर मृत्यू झाला. त्याचवेळी, दर्शन सोलंकी याच्या कुटुंबीयांनी असा दावा केला होता की, विद्यार्थ्याला अनुसूचित जातीतील असल्याने भेदभावाला सामोरे जावे लागत आहे. मृत्यू आणि घटनेशी संबंधित आरोपांसंदर्भात आयआयटी, बॉम्बे प्राधिकरणाने रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक नंदकिशोर यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली होती.
गेल्या महिन्यात पोलिसांनी सांगितले होते की, दर्शन सोलंकी याच्या मृत्यूच्या तपासासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या घटनेनंतर देशातील अनेक शहरांमध्ये विद्यार्थी संघटनांनी शैक्षणिक संस्थांमधील जातीय भेदभावाचा निषेध करीत निदर्शने केली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड