येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाकडून कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट

पुणे, ३० सप्टेंबर २०२३ : यावर्षी राज्यभरात मान्सून उशिराने दाखल झाला. आता परतीचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे समाधानकारक चित्र आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यात सर्वच भागात चांगला पाऊस झाला. यामुळे राज्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढला. अनेक शहरांचा पाणी प्रश्न मिटला तसेच शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. शनिवारी पुणे हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे हा पाऊस पडणार आहे.

अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी आणि गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गोव्यापासून कोकण किनारपट्टीपर्यंत हवामान विभागाने आँरेज अलर्ट जारी केला आहे. मच्छीमारांच्या अनेक बोटी बंदरातच असल्याने मच्छीमारांपुढे संकट निर्माण झाले आहे. येत्या २४ तासांत चक्रीवादळाची परिस्थिती वाढणार आहे. बदललेल्या परिस्थितीमुळे सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने सरासरी गाठली आहे.

हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर राज्यातील इतर भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात कोणताही अलर्ट दिला नाही. राज्यातील उर्वरित भागात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. त्याचबरोबर दोन दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या सर्वच भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा