हवामान विभागाचा पुणे,पालघर,ठाणे,रायगडला रेड अलर्ट तर मुंबई,रत्नागिरीला आँरेज अलर्ट

पुणे,२१ जुलै २०२३ : राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये नदी नाल्यांना पूर आला आहे. बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीत दरड कोसळली.या दूरघटनेत आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे.अजून काही दिवस राज्यात पाऊस कायम राहणार आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी पुढचे ४८ तास महत्वाचे आहेत. राज्य शासनाने आपात्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा तयार ठेवली आहे.

राज्यात पुणे,पालघर,ठाणे,रायगड ,जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.मुंबई,रत्नागिरी जिल्ह्याला आँरेज अलर्ट दिला आहे. तर सिंधुदुर्ग,सातारा,नाशिक,नंदुरबार,कोल्हापूर ,भंडारा , अकोला , अमरावती , बुलढाणा , चंद्रपूर , गडचिरोलीला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने चांगला तडाखा दिला आहे. चिपळूण आणि खेडमध्ये ४८ तासांत तब्बल ३२७ मीमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी कायम आहे. उत्तर रत्नागिरी भागात पावसाचा जोर जास्त आहे. पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. १९ जुलै पर्यंत राज्यात केवळ ५८ टक्के पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील धरणसाठा आता ३७ टक्क्यांवर पोहचला आहे.

पालघर मध्ये वसईवरुन वसई फाटा महामार्गाकडे जाणारा मुख्य रस्ता तिसऱ्या दिवशी ही पाण्याखालीच आहे. या भागात रात्रभर रिमझिम पाऊस सुरु आहे. अधूनमधून जोरदार पाऊस झाला आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले आहे. विरार पश्चिम विवा कॉलेज रस्ता, आगाशी स्टेशन रोड रस्ता, नालासोपारा सेन्ट्रल पार्क, स्टेशन रोड, आचोळा, वसई सनसिटी, वसई मुख्य रस्ता, एव्हरसाईन रस्ता हे तिसऱ्या दिवशी ही पाण्याखालीच गेलेले आहे.

जळगाव जिल्ह्यात नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रावेर शहरासह तालुक्यातील विवरे, भोकरी पाहणी केली. नद्यांना पूर आल्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना एनडीआरएफ आणि एसडी आरएफच्या पथकाला जिल्हाधिकारींनी दिल्या आहेत. एनडीआरएफचे एक तर एसडीआरएफची दोन पथके रावेरमध्ये तैनात करण्यात आली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा