पुणे, २८ एप्रिल २०२३: अवकाळी पावसाने गावे आणि शहरांमध्ये कहर सुरू केला. महाराष्ट्रासह देशभरात पुढील ५ दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) हा अंदाज व्यक्त केला. आज (२८ एप्रिल, शुक्रवार) ते ४ मे पर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडणार. उत्तर भारतात सर्वाधिक पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात वाढ झाली होती. अनेक भागात पारा चाळीशीच्या पुढे गेला होता. दुसरीकडे, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा आणि संत्री कुजली आहेत.
कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी आणि गेवराई तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, कंधार येथे आज सकाळी जोरदार पाऊस झाला. बुलढाण्यातील मोताळा येथेही जोरदार पाऊस झाला. आता पुढील पाच दिवसही महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील पाच दिवस उत्तर भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, तर मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता तर, दक्षिण भारतात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि केरळमध्ये पुढील पाच दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. असा हा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला.
न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड