‘श्रीमंतांवर कोविड-१९ उपकर लावा’- एच.डी. कुमारस्वामी

11

कर्नाटक, दि. २७ एप्रिल २०२०: कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलरचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी “लॉकडाऊनमुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी श्रीमंतांवर कोविड-१९ उपकर लावा” अशी मागणी केली आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्व उद्योग धंदे व छोटे व्यवसाय बंद आहेत. सरकारच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणावर या उद्योग धंद्यातून कर जमा होतो. परंतु हे उद्योगधंदे बंद असल्यामुळे सरकारला कर मिळणे बंद झाले आहे.

या पार्श्वभूमीवर रिकामी झालेली तिजोरी भरून काढण्यासाठी श्रीमंतांवर अधिक कर लावा अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या देशात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु आहे. पण अजूनही करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. त्यामुळे काही राज्यांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढू शकतो. महाराष्ट्रातही तशीच स्थिती आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. हा खर्च भागवणे आता सरकारला अवघड जात आहे. त्यामुळे सरकारला कोणते तरी एक मिळकतीचे माध्यम हवे आहे.

महाराष्ट्रात देखील राज ठाकरे यांनी मद्य व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला होता त्यामधून सरकारला मोठ्या प्रमाणावर कर मिळू शकतो. असे पत्र देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. सध्या महाराष्ट्रात परप्रांतीय मजूर हजारोंच्या संख्येत अडकले आहेत त्यांचा खाण्यापिण्याचा आणि वैद्यकीय सेवांचा मोठा खर्च राज्य सरकार वर पडत आहे.

एकूण परिस्थिती बघता ३ मे नंतर देखील लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तर एकंदर आर्थिक परिस्थिती बिघडणार आहे. काही अंशी उद्योगधंदे सुरू केले असले तरी यातून फार मोठी आर्थिक उलाढाल होणार नाही. त्यामुळे यांसारखे काही ना काही पर्यायी उपाय सरकारने आता शोधणे सुरू केले पाहिजे.