मिरजगाव, १३ जुलै २०२३ : बापलेकाच्या भांडणात मुलाने शिवीगाळ केल्याच्या रागातून, वडीलाने डोक्यात सिमेंट वीट घालून मुलाचा खून केला. कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. अमोल लाढणे वय ३४ असे मृत व्यक्तींचे नाव आहे. या प्रकरणी मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी खून करणाऱ्या रोहीदास बापूराव लाढणे याला अटक केली आहे.
कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे रोहीदास बापूराव लाढणे हे पत्नी विमल, मुलगा अमोल व त्यांची पत्नी अश्विनी हे एकत्रीत राहतात. बुधवारी रात्री बाप-लेक दारु पिऊन घरी आले. घरच्या पडवीतच त्यांच्यात भांडण झाले. मृत अमोल यांची पत्नी अश्विनी हिने दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. मुलगा हा वडिलांना अश्र्लिल शिवीगाळ करत होता. दोघांच्या झटापटीत मुलगा ओट्याच्या खाली पडला.
राग अनावर झालेल्या बापाने जवळच असलेली सिमेंट वीट डोक्यात मारल्याने अमोल खाली कोसळला. परत दुसरी वीट तोंडावर मारुन पित्यानेच मुलाला जागीच ठार केले. पत्नी विमल हिच्या फियादीवरुन मिरजगाव पोलिस ठाण्यात पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पिता रोहीदास बापूराव लाढणे याला मिरजगाव पोलिसांनी अटक केली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर