औरंगाबाद, दि. ८ मे २०२०: औरंगाबाद मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मालगाडी खाली १४ कामगार चिरडून ठार झाले आहेत. रात्री हे कामगार रेल्वे रुळावर झोपले होते या रूळावरून मालगाडी जाते असा त्यांना अंदाज नसावा त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. एकूण १९ मजूर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर औरंगाबादहून गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी पायी निघाले होते. रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार करण्यासाठी पूर्णा (जि. परभणी) जंक्शन येऊन रेल्वे रुग्णवाहिकाही निघाल्याचे वृत्त आहे. यात रेल्वेचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.
लॉक डाउन असल्यामुळे सर्वच वाहतूक बंद आहे त्यामध्ये रेल्वे देखील आहे. रुळावरून कोणती गाडी जाणार नाही असा अंदाज घेत त्यांनी या रुळावर विश्रांती घेतली असावी. परंतु इथून मालगाडी जाते असा त्यांना अंदाज नसावा आणि म्हणूनच ते तिथे झोपण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. या मार्गावरून जाणाऱ्या मालगाडी खाली हे सर्व मजूर चिरडले गेले आहेत.
गुरुवारी (ता. ७) रेल्वेने मध्यप्रदेशातील मजुरांसाठी भोपाळला एक गाडी रवाना केली. त्यामुळे आपल्यालाही एखाद्या अशाच गाडीने गावी जाता येईल, या आशेने जालन्याच्या एका स्टील कंपनीचे ते मजूर रातोरात औरंगाबादकडे पायी निघाले होते. शुक्रवारी (ता. ८) पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले. यात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी