चंद्रपूर तालुक्यात खनिकर्म विभागाच्या चाचण्या, भूगर्भात सापडले सोने

चंद्रपूर, २ डिसेंबर २०२२ : चंद्रपूर येथील मंजिरी आणि बामणी या भागात सोन्याच्या दोन खाणी आढळून आल्या आहेत. आधीपासूनच चंद्रपूर जिल्हा हा कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर आता भूगर्भात तांबे आणि सोन्याच्या खाणीही आढळून आल्याचे केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाच्या अहवालातून समोर आले आहे‌. सोन्याच्या दोन खाणी आढळून आल्याने खनिकर्म विभागाने चाचण्या सुरू केल्या आहेत. या भागात सोन्यासह तांबंही असू शकतं, असा अहवाल केंद्राच्या खनिकर्म विभागाने दिलाय.

चंद्रपूर तालुक्यातील भूगर्भात मौल्यवान सोने प्लॅटिनम आणि दुर्मिळातील दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे इरेडियम, रूथेलियम आणि रेडियम धातू असल्याचेही दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून समोर आले होते. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाचा शास्त्रज्ञांनी २००७ ते २०१० मध्ये केलेल्या परीक्षणात ही बाब उघड केली होती. आता सोन्याच्या खाणींचे ब्लॉक सापडल्याने याला अधिक दुजोरा मिळाला आहे. सिंधुदुर्गातही सोन्याच्या खाणी असल्याचा उघड झाले आहे. राज्यात भूगर्भात कोळसा बॉक्साइट, लोह या खनिजासह सोनेही दडले आहे, अशी माहिती मिळाली आहे.

राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याचा महसुलात वाढ झाली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. राज्यात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांकडून मिळाल्यामुळे आमच्या सरकारच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात सांगितले. त्याचप्रमाणे राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वांत मोठा स्टील प्रकल्प सुरू होऊ शकतो, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दिला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा