दुबई १६ मे २०२३ : थर्ड अंपायर ला जर कॅच योग्य पध्दतीने झालाय की नाही याची खात्री नसेल, तर अशा परिस्थितीत केवळ मैदानावरील पंचाचा निर्णय म्हणजेच ‘सॉफ्ट सिग्नल’ हाच अंतिम निर्णय मानला जायचा. परंतु आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) ‘सॉफ्ट सिग्नल’ निर्णय रद्द केला आहे. म्हणजेच झेल योग्य आहे की नाही हे आता फक्त थर्ड अंपायरच ठरवतील.
क्रिकेट तज्ज्ञांमध्ये सॉफ्ट सिग्नल हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सॉफ्ट सिग्नल म्हणजे सामन्यादरम्यान, जर ग्राउंड मधील अंपायरने थर्ड अंपायरकडे कॅच रेफर केला तर थर्ड अंपायरला त्याचे मत काय आहे हे सॉफ्ट सिग्नलद्वारे सांगावे लागायचे. म्हणजेच, ग्राउंड अंपायर आणि थर्ड अंपायर दोघेही कॅचबद्दल संभ्रमात असतील तेंव्हा ग्राउंड अंपायर सॉफ्ट सिग्नलद्वारे निर्णय द्यायचे. परंतु आता थर्ड अंपायर कडे निर्णय आल्यास, ते तंत्रज्ञानाच्या आधारे पुनरावलोकन करून स्वतः निर्णय घेतील म्हणजेच थर्ड अंपायरचा निर्णय फायनल आणि योग्य मानला जाईल.
येत्या ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात, इंग्लंड मधील ओव्हल क्रिकेट मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) ची फायनल होणार आहे. या मॅच पासून ‘सॉफ्ट सिग्नल’ निर्णय बंदीची सुरुवात होईल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) स्पष्ट केले. सॉफ्ट सिग्नल रद्द करण्यासोबतच आयसीसी आणखी काही बदल करणार आहे. WTC फायनल दरम्यान, दिवस संपेपर्यंत नैसर्गिक प्रकाशात समस्या आल्यास, अंपायर फ्लडलाइट्स चालू करू शकतात.
सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखालील ICC क्रिकेट समितीने सॉफ्ट सिग्नल रद्द करण्याची सूचना या आधी केली होती. आता आयसीसीने या समितीच्या सूचनेची अंमलबजावणी करून सॉफ्ट सिग्नल रद्द केला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे