धुळे : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून समाधानकारक पाऊस सुरु आहे. सर्वत्र पाऊस उशिरा सुरु झाल्याने भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. मान्सून सुरू झाल्यानंतर धुळे जिल्ह्यात मागच्या काही दिवसात मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. शेतकरी बी-बियाणे तसेच खते खरेदी करीत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बोगस बियाणे सापडल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. मात्र शेतकऱ्यांनी खात्री केल्याशिवाय बियाणे आणि खते घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या धुळे जिल्ह्यात पाऊस सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचे बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे.
धुळे जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून, पाऊस झाlल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतीसाठी लागणाऱ्या शेती साहित्याची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लागणारे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी पासे, कुराड खुरपे, वीळा, फावडे त्याचबरोबर इतर साहित्याची गरज लागत असते. त्यामुळे सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला असून येत्या काळात चांगला पाऊस होईल आणि शेतीकामांसाठी साहित्याची गरज लागणार असल्याने शेतकरी शेती साहित्य खरेदीसाठी बाहेर पडले आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजा पेक्षा यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला.मान्सून लांबल्याने अनेक शेतकऱ्यांनी आभाळाकडे डोळे लावले होते. चातक पक्षाप्रमाणे शेतकऱ्यांनी पावसाची आतुरतेने वाट पाहिली. परंतु आता मान्सूनने हजेरी लावली आहे आणि मान्सून लवकरच सर्वत्र सक्रिय होईल या अपेक्षेतून शेतकरी वर्ग आपआपल्या कामाला लागल्याचे दिसून येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर