इंदापुरात शेतकऱ्याच्या दुधाला लिटरला ६२ रू. दर, अमूलशी करारामुळे फायदा

इंदापूर, दि. २८ जून २०२० : इंदापूर येथील दुधगंगा दुध उत्पादक सहकारी संघाकडे दूध घालणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला म्हशीच्या दुधाला प्रति लिटरला रू. ६२ एवढा समाधानकारक दर दि. २५ जून रोजी मिळाला आहे. तसेच दूधगंगा संघाकडून गाईच्या दुधाला प्रति लिटरला हमीभाव रू.२५ मिळत असून, अनेक शेतकऱ्यांना दुधाच्या गुणवत्तेनुसार रू. २६,२७ असा ही दर मिळत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

दूधगंगा दूध संघाचे संस्थापक व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील दूध संघाने देशातील नावाजलेल्या अमूल बरोबर नुकताच करार केला असून दूध संघाचे संकलन दि. ८ जून पासून सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्या दुधाचे प्रत्येकी १० दिवसाचे पेमेंट बँक खात्यामध्ये जमा केले जात आहे. दूधगंगा संघ हा इंदापूर तालुक्यातील एकमेव सहकारी दुध संघ आहे. या सहकारी दुध संघाकडून शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव व त्यापेक्षा जादा दर मिळत असल्याने इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना येत्या काही दिवसांमध्ये अमूलच्या सहकार्याने पशुखाद्य, वैद्यकीय सुविधा आदी अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती दूध संघाचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी दिली. दुधगंगा दूध संघाकडून शेतकऱ्यांच्या दुधाला सर्वात जास्त दर मिळत असल्याने इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा