जळगाव, २८ जुलै २०२३ : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील अवैध गावठी दारू विक्रीसंदर्भात आमदारांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांसह गिरीश महाजन यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. मंत्र्यांनी आगपाखड केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला कारवाईची उशिरा का होईना पण जाग आली. गेल्या २४ तासात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी छापे टाकून २७ गुन्हे नोंदवले असून २६ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला होता. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण हे देखील उपस्थित होते. या बैठकीत मंगेश चव्हाण यांनी उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांची तक्रार केली होती. अवैधपणे बनावट दारु विकणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. उलट काही अधिकाऱ्यांकडून हप्ता घेतला जातो. त्यामुळे आरोपी हे आणखी फोफावत असल्याची तक्रार मंगेश चव्हाण यांनी केली होती. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी भर बैठकीत उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले होते.
जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यावर उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागा झाला. त्यात बैठकीत पालक मंत्र्यांनसह मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण यांनीच या विषयावर बोट ठेवल्याने वरिष्ठ पातळीवर हालचाली घडल्या. त्यानंतर २४ तासात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाने जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकले. यातून २६ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच २७ गुन्हे दाखल करण्यात आले.
न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर