जळगाव १७ जून २०२३: जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका हा कापुस पिकवणारा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापूस लागवड केली जाते. मे महिन्यात लागवड केलेल्या कापसाची आता निंदणी सुरू आहे. शेतात कापूस निंदणी करत असतांना महिला शेतमजूर या जुनी अहिराणी गाणी म्हणतात. या गाण्यांमधून अहिराणी भाषेला आणि जुन्या गाण्यांना उजाळा द्यायचा प्रयत्न या महिला करतायत. खानदेशात म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात अहिराणी भाषा बोलली जाते. आताच्या काळात फक्त जुनी माणसेच या भाषेचा वापर करताना दिसतात. त्यातल्या त्या गावाकडची माणसे, शेतकरी ही भाषा बोलतात. अहिराणीतील कविता कवयित्री बहिणाबाईंनी अजरामर करून ठेवल्या आहेत. अहिराणी गाणी सुद्धा या भागातील गावकुसात लोकप्रिय असून, लोकांच्या मनोरंजनाचा ही गाणी एक प्रमुख आधार आहेत. अहिराणी ओव्या, गाणी, म्हणी तसेच बोलीभाषा ही काही जुन्या लोकांनी जिवंत ठेवली आहे. शेतात ही गाणी गायल्याने सगळ्यांच मनोरंजन होत, त्यामुळे शेतात काम करत असतांना दिवस कसा निघून जातो याच भान सुध्दा राहत नाही. शिवाय आताच्या मुलींना देखील, जुन्या जमान्यातील अहिराणी गाणे यायला पाहिजे हा उददेश सुद्धा यामागे असतो, असे महिला शेतमजूर मीराबाई माळी यांनी न्युज अनकटला सांगितले. न्युज अनकट प्रतिनिधी- आत्माराम पाटील, चोपडा (जळगाव)