कराड तालुक्यात मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास कठोर शिक्षा व्हावी, विविध संघटनांसह नागरिकांच्या संतप्त भावना

कराड, सातारा ४ ऑगस्ट २०२३ : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. ज्या नराधमाने आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला आहे, त्याला पोलिसांनी गजाआड केले आहे. आता याप्रकरणी जलद गतीने तपास करुन पोलिसांनी नराधामा विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे. तसेच लवकरात लवकर त्या नराधामास कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी शिवसेना, हिंदू एकता आंदोलन, हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना केली आहे.

संबंधित चिमुरडीचे आई वडील कामानिमित्त घराबाहेर गेल्याची संधी साधत नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. संबंधित चिमुरडीला ठिकठिकाणी चावे घेतले होते. या धक्कादायक प्रकारानंतर मुलीच्या नातेवाईकांनी कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. या प्रकारची माहिती मिळताच तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, हिंदू एकता आंदोलन समितीचे अजय पावसकर, हिंदू जनजागृती समितीचे अनिल कडगे, गणेश कापसे व कार्यकर्ते यांनी कराड पोलिसांची भेट घेतली. पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्याशी चर्चा करताना या प्रकरणी जलद गतीने तपास करुन नराधामास कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सर्वांनी मिळून केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा