नाशिक, दि.२ मे २०२० : नाशिक जिल्ह्यातील भगूर गावाजवळ असणाऱ्या दोनवाडे गावातील पप्पू शिरोळे यांच्या मळ्यालगत असलेल्या वस्तीत बिबट्याने एका तीन वर्षे वयाच्या चिमुरड्याचा बळी घेतला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रुद्र राजू शिरोळे हा तीन वर्षीय चिमुरडा शुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास आपल्या घराच्या ओट्यावर खेळत होता. मात्र, जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घालून त्याला आपले भक्ष्य बनवले. बिबट्या त्याला घेऊन शेजारी असलेल्या ऊसाच्या शेतात घेऊन गेला. शिरोळे परिवाराने आरडाओरडा केल्याने नागरिकांनी शेतात धाव घेतली. परंतु तोपर्यंत बिबटयाच्या हल्ल्यात रुद्रचा मृत्यू झाला होता.
याबाबत ग्रामस्थांनी त्यास त्वरित देवळाली कॅम्पच्या रुग्णालयात दाखल केले परंतु तो मृत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
या शिवारात अनेकदा बिबट्याचे दर्शन होत असल्याचे नागरीकांकडून सांगण्यात आले. तरी वनविभागाने या परिसरात पिंजरा लावावा. अशी मागणी नागरिकांडून होत आहे .
न्युज अनकट प्रतिनिधी: