नाशिक मधील बागलाण तालुक्यात आराई गावामध्ये लागले, ‘राजकीय पुढार्‍यांना गावात प्रवेश बंदी’चे बॅनर

4

सटाणा २० जून २०२३: नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी वर्ग आक्रमक झालाय. त्यातच काही दिवसांपूर्वी शेतकरी क्रांती मोर्चाने सटाणा, बागलाण तालुक्यात खासदार, आमदारसह सर्व पक्षीय पुढाऱ्यांना गाव बंदी केली होती, तर पुढाऱ्यांनी गावात प्रवेश केल्यास त्यांना कांदे फेकून मारू असा इशारा दिला होता.

या गोष्टीला आता महिनाही उलटत नाही तोच आता आराई गावात थेट राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी घातली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सध्या येथे लागलेल्या बॅनरची आणि त्यावर असलेल्या व्यंगचित्राची चांगलीच चर्चा होत आहे. बागलाण तालुक्यातील आराई गावात स्वर्गीय शरद जोशी प्रेरीत शेतकरी संघटनेचे नयन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली, गावात बॅनर झळकवून राजकीय पुढार्‍यांना प्रवेश बंदी घातली आहे.

येथे लावलेल्या बॅनरवर व्यंगचित्र असून ते गावच्या प्रवेशद्वारावर लावले आहे. यामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की, कांदा व इतर शेती पिकांना बाजार भाव मिळत नाही, कोणताही राजकीय पुढारी शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना यांच्याकडे लक्ष देत नाही. आपल्यावर होणाऱ्या अन्यायामुळे शेतकरी आक्रमक झाले असून त्यामुळे त्यांनी गाव पुढार्‍यांना गावात प्रवेश बंदी घातली आहे.

नुकतेच काही दिवसापूर्वी लासलगाव बाजार समितीच्या उपबाजारात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. तेलंगणामध्ये महाराष्ट्रातल्या कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रुपये बाजार भाव मिळत असून, आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या लासलगाव मध्ये, शेतकऱ्यांना क्विंटलला २०० ते ३०० रुपये बाजार भाव मिळत होता. म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन करून लीलाव बंद पाडले होते. आता या गावाने घेतलेल्या भूमिकेमुळे सरकार याकडे किती गांभीर्याने पाहते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा