पुणे-मुंबईत सीएनजीच्या दरामध्ये वाढ तर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा ही फटका

पुणे, 6 एप्रिल 2022: भारतीय बाजारपेठेत वाहनांच्या इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोल-डिझेलपासून ते सीएनजीपर्यंतचे दर झपाट्याने वाढत आहेत. देशात पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, त्याचप्रमाणे सीएनजीवरही महागाईने आक्रमण केले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ

भारतीय तेल कंपन्यांनी आज (बुधवार) 6 एप्रिल रोजी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. दोन्ही वाहनांच्या इंधन दरात प्रतिलिटर 80-80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. यासह देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

पुण्यात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर मागे 80 पैशांनी महागल्याने पेट्रोल प्रति लिटर 119.96 रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलने देखील शंभरी पार केली असून, डिझेल प्रति लिटर 102.67 रुपयांवर पोहोचले आहे. पुण्यात पावर पेट्रोल 124.46 रुपये लिटर मिळत आहे. एकीकडे देशभरात पेट्रल डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. गेल्या 22 मार्चपासून इंधनाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच आता पुणेकरांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. तो म्हणजे शहरात सीएनजीच्या (CNG) दरात देखील वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात जवळपास सहा रुपयांनी वाढ झाली आहे. पूर्वी सीएनजी गॅसची किंमत प्रति किलो 62.20 रुपये एवढी होती. मात्र आता सीएनजीचे दर 68 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. नवे दर मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत.

मुंबईत देखील सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे सात रुपयांची तर पीएनजीच्या दरात प्रति किलोमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आता मुंबईत सीएनजीची किंमत प्रति किलो 67 रुपये एवढी झाली आहे. पूर्वी एक किलो सीएनजीसाठी साठ रुपये लागत होते. तर पीएनजीच्या दरात पाच रुपयांची वाढ करण्यात आली असून, पीएनजीची किंमत प्रति किलो 41रुपये एवढी झाली आहे. तर दुसरीकडे पुण्यात देखील सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे सहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता पुण्यात सीएनजीचे दर प्रति किलो 68 रुपयांवर पोहोचले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 109.24 डॉलरवर पोहोचले आहे. तेलाच्या वाढत्या किमतींवर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, अमेरिका, कॅनडासह विकसित देशांमध्ये एका वर्षात पेट्रोलच्या किमती 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर भारतात केवळ पाच टक्के वाढ झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा