ठाणे, दि. १६ जुलै २०२० : गेल्या काही दिवसांपासून शहरी भागात पावसाने दडी मारली होती. मात्र आता ठाणे जिल्ह्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरणासह रिमझीम पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाच वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या २४ तासांत ५७.८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात आतापर्यंत ४५ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे पुण्याहून २५ जणांचे एनडीआरएफचे एक पथक ठाण्यात दाखल झाले आहे.
ठाणे शहरासह ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे इमारती कोसळण्यासारख्या दुर्घटना घडल्यास संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी ठाणे पालिकेने अग्निशमन दल यांच्यासह ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक तसेच एनडीआरएफची तुकडी सुसज्ज ठेवली आहे. मात्र आजच ठाण्यातील कोपरीतील ३५ वर्षांच्या जुन्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील गैलरीचा भाग सकाळी पडला. ही इमारत धोकादायक असल्याने आधीच रिकामी करण्यात आल्यामुळे येथे सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी ठाणे शहरात २६.५० मिमी, कल्याणमध्ये २ मिमी, मुरबाडमध्ये १ मिमी , उल्हासनगरमध्ये १६ मिमी , अंबरनाथ ३.३० मिमी, भिवंडी ६ आणि शहापूरला ३ मिमी पाऊस गेल्या २४ तासांत पडला. पालघर जिल्ह्यात तुरळक पाऊस पडला मात्र वसई तालुक्यात सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे .
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे