पुणे, दि. ११ मे २०२०: सध्या आपण पाहतो आहे, कोरोनाच्या प्रादूर्भावाला रोखण्यासाठी शासन तसेच जनता एक होऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत. चाललेल्या या परिस्थितीत अनेक नागरिक, संघ आपल्या जबाबदारीचे भान ठेवत स्वत:हून होईल तशी मदत करत आहेत. कोरोनाच्या या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक तरुण, नागरिक, संघ समोर येऊन आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नात कोरोना बाधित क्षेत्रात जाऊन कोरोना चाचणी करण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. त्यातीलच प्रशांत धोत्रे आणि प्रतीक प्रविण सातपुते, यांनी सध्याच्या परिस्थितीत मिळालेला त्यांचा अनुभव न्यूजअनकट सोबत बोलताना सांगितला.
चला अर्पूया देह हा मायभुमीला.. – प्रतीक प्रविण सातपुते
आपल्या शरीराचे तापमान साधारणतः ३६/३७ ℃ असते. केवळ ५-१० मिनिट्स मास्क घातल्यावर तोंडाला घाम फुटतो पण इथे तर हातात ३ ग्लोव्हज, २ मास्क, डोळ्यांवर हवाबंद गॉगल्स, शूज कव्हर आणि पीपीई किट घातल्यानंतर आपले तापमान ४०-४२ च्या जवळपास पोहचते. घामात पूर्ण अंघोळ होते.
तीन-चार तास वस्तीवस्तीत गल्लीबोळात दारात जाऊन घरातल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी केली जाते. एकदा हे किट घातल्यावर पाणी, लघवी किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव काढणे नाही. मोहीम फत्ते झाल्यावरच काढू शकतो. कारण हे एकदा वापरून फेकून द्यावे लागणारे किट आहेत. हे सर्व सांगण्याचा खटाटोप एवढ्याच साठी की आम्ही काही दिवस हे कार्य करणार आहोत पण गेली कित्येक महिने जगाच्या कानाकोपऱ्यात आरोग्य नायक कार्यरत आहेत. आपल्यासाठी काम करत आहेत त्यांना शतशः नमन..
या अशा युद्धजन्य परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नांत कोरोना बाधित क्षेत्रात जाऊन कोरोना चाचणी कार्यात काम करण्याची संधी मिळाली. यासाठी सर्वांचे आभार.. आणि माझ्या आई वडिलांच्या ही धैर्याला सलाम..
पुढील सात दिवस याच कार्यात सहभागी असेन.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती करड