पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे, २९ ऑक्टोबर २०२२ : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात लोणी पाबळ रोडवर बांधन वस्ती येथे बन्सी सिनलकर यांच्या गोठ्यात बिबटयाने पाळीव कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कुत्र्याच्या भुंकण्याने घर मालक बन्सी सिनलकर यांनी गोठ्याकडे धाव घेतली. यावेळी त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी जोरजोरात आरडा ओरडा करून बिबट्याला पळून लावले.

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे . यावर्षी अतिवृष्टीने शेतकरी वर्ग आधीच हवालदिल झाला आहे.आता पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतीच्या कामाबरोबरच सकाळ, संध्याकाळच्या वेळी दूध काढणे जनावरांना चारा पाणी करणे आदी कामे शेतकरी वर्गाला करावी लागतात. परंतु आता बिबट्याच्या भीतीने शेतकऱ्यांच्यात दहशत पसरली आहे. त्यामुळे ते घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.

येथील पोलीस पाटील संदीप आढाव यांनी वनविभागाच्या कर्मचारी गिते मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण सुट्टीवर असल्याचे सांगितले. तर वनविभागाच्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही घटना गांभीर्याने घेतली नाही. लोणी परिसरात बऱ्याच दिवसापासून बिबट्याचा वावर असून या परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा