बंगळुरू, २७ एप्रिल २०२३: सलग चार पराभवानंतरही आपला उत्साह कायम ठेवत कोलकाता नाईट रायडर्सने अखेर विजय मिळवला. नितीश राणाच्या नेतृत्वाखालील केकेआरने या मोसमात दुसऱ्यांदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. जेसन रॉय आणि नितीशच्या स्फोटक खेळीनंतर सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्तीच्या फिरकीच्या जोरावर केकेआरने २१ धावांनी विजय मिळवला. यासह बेंगळुरूला सलग दोन विजयानंतर पराभवाचा सामना करावा लागला.
कर्णधार विराट कोहली आणि फाफ डुप्लेसी यांनी स्फोटक सुरुवात करून बंगळुरूसाठी केवळ २ षटकांत ३० धावा केल्या. कोलकाताचा कर्णधार नितीश राणाचा डाव इथं कामाला आला. त्याने तिसर्याच षटकात युवा लेगस्पिनर सुयश शर्माला आक्रमणावर ठेवले आणि तो येताच सुयशने डुप्लेसीची विकेट घेतली. त्याच्या पुढच्याच षटकात सुयशने (२/३०) शाहबाज अहमदचाही त्रिफळा उडवला.
स्फोटक खेळी खेळणारा ग्लेन मॅक्सवेल पुन्हा वरुण चक्रवर्तीचा (३/२७) बळी ठरला. त्यामुळं वेगवान धावा करणाऱ्या विराट कोहलीचा वेगही थांबला. मात्र, महिपाल लोमरोडने (३४) कोहलीला चांगली साथ दिली. दोघांमध्ये ५५ धावांची भागीदारी झाली. मात्र, लागोपाठच्या षटकांत दोघेही पॅव्हेलियन मध्ये परतले.
यामध्ये कोहलीची (५४) विकेट सर्वात महत्त्वाची ठरली, ज्याने त्याचवेळी पाचवं अर्धशतक झळकावलं. १३व्या षटकात आंद्रे रसेलच्या (२/३०) पहिल्या चेंडूवर कोहलीने जबरदस्त पुल शॉट मारला, पण व्यंकटेश अय्यरने चौकारावर जबरदस्त झेल घेतला. येथून बेंगळुरूचा पराभव निश्चित झाला. दिनेश कार्तिक (२२) कडून काही अपेक्षा होत्या पण तोही काही करू शकला नाही आणि बंगळुरूने ८ गडी गमावून केवळ १७९ धावा केल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड