अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी या कंपन्या शर्यतीत, ६८% प्रकल्प असणार गुजरात मध्ये

नवी दिल्ली, २४ सप्टेंबर २०२०: नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशननं (एनएचएसआरसीएल) बुधवारी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पहिल्या निविदेसाठी बोली लावण्यास सांगितलं आहे. प्रकल्पाच्या २३७ कि.मी. विभागातील २०,००० कोटी रुपये किंमतीच्या बांधकाम कामासाठी लार्सन अँड टुब्रो या कंपनी सहित अन्य दोन कंपन्यांनी बोली लावली आहे .

मीडिया रिपोर्टनुसार एनएचएसआरसीएल’नं म्हटलं आहे की, या प्रकल्पाची ही सर्वात मोठी निविदा आहे ज्या अंतर्गत गुजरातच्या वापी आणि वडोदरादरम्यान बुलेट ट्रेन अलाइनमेंटच्या ४७ टक्के रकमेचा समावेश केला जाणार आहे. त्याअंतर्गत या कॉरिडॉरमध्ये वापी, बिलीमोरा, सूरत आणि भरुच ही चार स्थानकंही बांधली जातील.

या कंपन्यांनी लावली बोली

एनएचएसआरसीएल’नं नमूद केलं की, या स्पर्धात्मक निविदेत तीन बिडर्स’नी भाग घेतला असून यामध्ये एकूण सात इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांचा समावेश आहे. आफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर, आयआरकॉन इंटरनेशनल आणि जेएमसी प्रोजेक्ट इंडिया यांनी एकत्रितपणे बोली लावलीय. त्याचप्रमाणे एनसीसी-टाटा प्रोजेक्ट-जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स’नं एकत्रितपणे बोली लावलीय. तर लार्सन अंड ट्युब्रो या एकट्या कंपनीनं बोली लावलीय.

८३ टक्के भूसंपादन

२३७ कि.मी. लांबीच्या या कॉरिडॉरमध्ये २४ नद्या व ३० रोड क्रॉसिंग असतील. हा संपूर्ण विभाग गुजरातमध्ये आहे जिथं ८३ टक्क्यांपेक्षा जास्त जमीन ताब्यात घेण्यात आलीय. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत सांगितलं होतं की, भूसंपादनाचे काम मार्च २०२० च्या पूर्वी पूर्ण केलं जाणार होतं, परंतु महाराष्ट्रातील काही अडचणींमुळं हे झालं नाही. हा संपूर्ण प्रकल्प ५०८ कि.मी.चा असून त्यापैकी ३४९ किमी गुजरातमध्ये येतो.

९० हजाराहून अधिक लोकांना रोजगार

नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या मते, केवळ या प्रकल्पातून जवळपास ९०,००० लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा