दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने टीम इंडियावर दोन विकेट्सनी केली मात, मालिकेत २-० ने आघाडी

पुणे, ७ ऑगस्ट २०२३: पुन्हा एकदा फलंदाजांचे निराशाजनक प्रदर्शन झाल्याने, भारताला सलग दुसऱ्या टी-२० मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. कारण वेस्ट इंडिजने रविवारी दोन विकेट्सने विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना भारताने तिलक वर्माच्या पहिल्या अर्धशतकाच्या जोरावर सात विकेट्सवर १५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात निकोलस पूरनने ४० चेंडूत ६७ धावा करत संघाच्या विजयाचा पाया रचला. वेस्ट इंडिज १८.५ षटकांत ८ गडी गमावून लक्ष्य गाठले.

यजुवेंद्र चहलने १६ व्या षटकात दोन विकेट घेत भारताला सामन्यात परत आणण्याचा नक्कीच प्रयत्न केला, पण अल्झारी जोसेफ आणि अकील हुसैन यांनी २६ धावांची अखंड भागीदारी करून भारताच्या आशा धुळीस मिळवल्या. वेस्ट इंडिजला शेवटच्या दोन षटकांत १२ धावांची गरज होती आणि भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने आपला सर्वात यशस्वी गोलंदाज चहलकडे चेंडू न सोपवून चूक केली.

नवीन चेंडू हाताळताना पंड्याने पहिले षटक टाकले ज्यात भारताने ब्रेंडन किंग (०) आणि जॉन्सन चार्ल्स (२) यांचे विकेट्स घेतले. यानंतर पूरनने दडपणाखाली न येता फलंदाजी करत पंड्यालाही षटकार ठोकला. तत्पूर्वी, फलंदाजी करताना वर्माने भारतासाठी ४१ चेंडूत ५१ धावा केल्या आणि टी-२० सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरला.

गेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, भारताने १८ धावांवर दोन विकेट गमावल्या असताना वर्मा फलंदाजीला आला. त्याने इशान किशन (२७) सोबत ४२ धावांची आणि कर्णधार पंड्यासोबत ३८ धावांची भागीदारी केली. पंड्याने (२४) दोन षटकार मारून भारताची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला पण अल्झारी जोसेफच्या यॉर्करवर त्याची विकेट गमावली. जोसेफने २८ धावांत दोन गडी बाद केले.

नियमित अंतराने विकेट पडत राहिल्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय चुकीचा ठरला. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने गोलंदाजांचा योग्य वापर केला. इशाननेही अकिल हुसेनला २३ चेंडूंच्या खेळीत षटकार ठोकला पण रोमॅरियो शेफर्डने त्याला बाद केले. शुभमन गिल (सात) पुन्हा एकदा अपयशी ठरला.

उपकर्णधार सूर्यकुमार यादवही एक धाव घेऊन धावबाद झाला. काइल मायर्सने त्याला स्क्वेअर लेगवरून अचूक थ्रो मारून बाद केले. संजू सॅमसन (सात) देखील कोणतेही योगदान देऊ शकला नाही. तो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चुकला आणि निकोलस पूरनने त्याला यष्टिचीत करण्यात कोणतीही चूक केली नाही. हुसेन, जोसेफ आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा