आकुर्डी, २९ डिसेंबर २०२२ : आकुर्डी ग्रामस्थांचे कुलदैवत खंडोबामाळ येथील श्री खंडोबाच्या उत्सवानिमित्त मंदिरास आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे; तसेच मंदिर फुलांनी सजविले आहे. बुधवारी (ता. २८) सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी; तसेच नैवेद्य ठेवण्यासाठी गर्दी केली होती. दर्शन घेतल्यानंतर भाविक तळी भंडारा भरत होते. तर काही जण जागरण-गोंधळ देखील घालत होते. यावेळी वाघ्या-मुरळीचा जागरण-गोंधळ पाहायला मिळत होता. कोरोनाचे संकट असल्याने देवस्थानतर्फे येणाऱ्या प्रत्येक भाविकांस मोफत मास्क वाटप केले होते. हा उत्सव बुधवार (ता.२८) व गुरुवार (ता.२९) दोन दिवस आहे.
आकुर्डीगावचे ग्रामदैवत खंडोबा यात्रेनिमित्त मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. उत्सवानिमित्त मंदिरात श्री खंडेरायाच्या मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती करण्यात आली. सायंकाळीदेखील महाआरती करण्यात आली. दर्शनासाठी दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
यात्रेनिमित्त गुरुवारी कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते; तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त आकुर्डी गावात विविध प्रकारच्या वस्तू विक्रेत्यांनी स्टॉल थाटले आहेत. खरेदीसाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
दरम्यान, पुणे-मुंबई महामार्गावर आकुर्डी येथील खंडाेबामाळ चौकात खंडोबा मंदिर आहे. येथील यात्रा पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. या यात्रेसाठी दोन लाखाे भाविक येतात. त्यामुळे मंदिर परिसरात गर्दी होते. भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निगडी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल केला आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले असून, बुधवारी (ता. २८) आणि गुरुवारी (ता. २९) आकुर्डी खंडोबामाळ चौक येथे वाहतुकीत बदल केला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे :-
- थरमॅक्स चौकाकडून येणारी वाहतूक ही आर. डी. आगा मार्गाकडून गरवारे कंपनी कंपाऊंडपर्यंत येऊन तेथील टी जंक्शनवरून खंडोबामाळ चौकाकडे न जाता ती डावीकडून परशुराम चौकाकडून मोहननगर, चिंचवड मार्गे इच्छित स्थळी जातील.
- परशुराम चौकाकडून येणारी वाहतूक ही खंडोबामाळ चौकाकडे न येता ती परशुराम चौकातून आर. डी. आगा मार्गे गरवारे कंपनी कंपाऊंडपर्यंत येऊन टी जंक्शनवरून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील.
- चिंचवड, दळवीनगर व आकुर्डी गावठाणातून येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चोकाकडून थरमॅक्स चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असून सदरची वाहने ही टिळक चौक/ शिवाजी चौक बाजूकडे वळून इच्छितस्थळी जातील.
- टिळक चौकाकडून येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चौकातून थरमॅक्स चौक बाजूकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असून सदरची वाहने सरळ चिंचवड स्टेशन/दळवीनगर मार्गे इच्छितस्थळी जातील.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील