‘येळकोट येळकोट जय मल्हार…’च्या निनादात आकुर्डीतील खंडोबा मंदिर परिसर दुमदुमला

पिंपरी-चिंचवड, २९ नोव्हेंबर २०२२ : शहरासह जिल्हाभरात रविवारी भक्तिपूर्ण वातावरणात चंपाषष्ठी साजरी करण्यात आली.आकुर्डीतील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर विधिवत पूजन झाले. सकाळी आरती होऊन त्यानंतर भाविकांकडून भरीत-भाकरीचा नैवेद्य खंडोबाला दाखविण्यात आला. अनेक भाविकांनी घरातून आणलेल्या टाकांची देवाशी भेट घडवून येथील वाघ्या-मुरळींकडून पाचपावली करून घेतली जात होती.
पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील विविध खंडोबा मंदिरांतही विधिवत पूजन झाले.

श्रीखंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये खंडेरायांची उपासना केली जाते. खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते. याला षड्रात्रोत्सव असे म्हणतात. ता. २४ नोव्हेंबरपासून या षड्रात्रोत्सवाला सुरवात झाली असून, आज मंगळवारी (ता. २९) चंपाषष्ठीला या उत्सवाची सांगता होणार आहे. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीला खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले, अशी आख्यायिका आहे. पाच दिवसांच्या उपासनेनंतर सहाव्या दिवशी म्हणजे आज हा उपवास सोडायचा दिवस आहे. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जागरात आज जेजुरीसह सर्वत्र खंडोबा मंदिर परिसर दुमदुमून उठतात.

या सहा दिवसांत अगदी मनोभावाने खंडेरायाची पूजा
केली जाते. या सहा दिवसांच्या नवरात्रात देवापुढे नंदादीप ठेवतात. खंडेरायास बेल, दवणा व झेंडूची फुले वाहतात. खंडोबाच्या पूजेत भंडारा सर्वांत महत्त्वाचा. भंडारा म्हणजे हळदीची पूड. भंडाऱ्याशिवाय खंडेरायाची पूजा अपूर्णच. खंडोबाच्या नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण या खास पक्वानाचं नैवेद्य दिलं जातं. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा