राज्यात कोविड – १९ चाचण्यांचे दर पुन्हा झाले कमी

मुंबई, दि. १२ ऑगस्ट २०२०: कोविड -१९ संकट देशामध्ये दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात राज्यात सर्वात जास्त कोविड -१९ प्रकरणे सापडली आहेत. राज्यात याबाबतीत परिस्थिती गंभीर होत चालली आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. मात्र, यासाठी घेण्यात येणाऱ्या चाचण्या देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहे. जेवढे रुग्णांवर उपचार होणे गरजेचे आहे. कारण, झपाट्याने चाचण्या झाल्या तरच योग्य वेळेत रुग्णांवर उपचार होणे शक्‍य होणार आहे. मात्र, चाचणी करण्यासाठी लागणारे शुल्क जास्त असल्याने तसेच खाजगी प्रयोगशाळा रुग्णांकडून जास्त पैसे आकारत असल्यामुळे रूग्ण देखील याबाबत सातत्याने तक्रार करत आहेत.
     
याबाबत आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोविड -१९ चाचणीच्या दरामध्ये सरकारने पुन्हा एकदा कपात केली आहे. राज्य सरकारने तिसऱ्यांदा ही कपात केली आहे. यावेळी राज्य सरकारने कोविड -१९ चाचणी दरामध्ये ३०० रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
     
आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १९००, २२०० आणि २५०० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असणार आहे. आता सॅम्पल घेऊन त्याची वाहतूक आणि रिपोर्टिंगसाठी २२०० रुपयांऐवजी १९०० रुपये, तर स्वॅब कलेक्शन सेंटर, कोरोना केअर सेंटर्स, क्वारंटाईन सेंटर येथून स्वॅब घेतल्यास २५०० रुपयांऐवजी २२०० आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २५०० रुपये असे दर राहणार आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा