इंदूर, ३ मार्च २०२३ : इंदूर येथील होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने यजमान भारताचा नऊ गडी राखून पराभव केला. विजयासाठी ऑस्ट्रेलियन संघाला ७६ धावा करायच्या होत्या. शुक्रवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात केवळ एक विकेट गमावून पूर्ण केल्या. यासह ऑस्ट्रेलियाने मालिका वाचविण्यासाठी आपले प्रयत्न जिवंत ठेवले आहेत. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे ठेवली आहे. ऑस्ट्रेलियाने तिसरा कसोटी सामना गमावला असता तर मालिकाही गमावली असती; पण आता मालिकेत बरोबरी साधण्याची संधी त्यांना आहे.
या मालिकेत भारत सध्या २-१ ने पुढे आहे. चौथा कसोटी सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार असून, ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकल्यास मालिका २-२ अशी बरोबरीत राहील. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत आपल्याच जाळ्यात अडकला. त्याने या सामन्यासाठी फिरकीला अनुकूल खेळपट्टी बनवली ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे फिरकीपटू विशेषतः नॅथन लियॉन यांनी भारताच्या फलंदाजांना अडकविले.
भारतीय संघाचा दुसरा डाव दुसऱ्या दिवशी १६३ धावांवर आटोपला आणि यासोबतच दिवसाचा खेळही संपण्याची घोषणा करण्यात आली. भारताने पहिल्या डावात १०९ धावा केल्या होत्या. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १९७ धावा केल्या होत्या आणि ८८ धावांची आघाडी घेतली होती. यानंतर भारताने आपला दुसरा डाव संपवला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाला ७६ धावांचे लक्ष्य दिले. या विकेटवर हे लक्ष्य सोपे नव्हते. कारण ही विकेट फिरकीपटूंना उपयुक्त आहे आणि अशा परिस्थितीत भारताकडे तीन उत्कृष्ट फिरकीपटू आहेत. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यासमोरही ऑस्ट्रेलियाला मात्र याचा फटका बसला नाही आणि त्यांनी सहज विजयी लक्ष्य गाठले.
भारताने तिसर्या दिवसाच्या पहिल्याच षटकात उस्मान ख्वाजाला बाद केले आणि ऑस्ट्रेलियाचे पारडे जड होईल असे वाटत असले तरी ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी आणखी विकेट पडू न देता आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हेड ५३ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ४९ धावा करून परतला. त्याचवेळी लबुशेनने ५८ चेंडूंत नाबाद २८ धावा केल्या.
त्याचबरोबर या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय फलंदाजांपेक्षा सरस खेळ दाखविला. उस्मान ख्वाजाने पहिल्या डावात अर्धशतक झळकाविले. त्याने १४७ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ६० धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात भारताला केवळ एक विकेट घेता आली. हेड आणि लबुशेन यांनी शानदार फलंदाजी करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड