मुंबई, ११ ऑगस्ट २०२०: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा राज्यातील सर्वच सार्वजनिक उत्सवांवर निर्बंध आले आहेत. दरवर्षी मुंबईमध्ये लाखोंची बक्षिसे असलेल्या हंड्या फोडल्या जातात. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यावर विरजन पडले असले तरी दहिहंडीचा सराव करण्यासाठी रक्त आटवणार्या गोविंदा व गोपिकांनी रविवारी मुंबईमध्ये हजारपेक्षा अधिक रक्त बाटल्यांचे संकलन केले.
कोरोनामुळे उत्सव मर्यादित स्वरुपात करण्याला पसंती नागरिकांनीही दिली आहे. दहिहंडी हा महाराष्ट्रातील सर्वात उत्साहवर्धक तरुणांचा आणि छोट्या बाळगोपाळांचा उत्सव समजला जातो. आता विलेपार्लेतील पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या गोपिकांनी बुधवारी सोशल डिस्टन्सिंग राखत दहिहंडीचे थर लावण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार गोपिकांनी तयारीही केली आहे. दहिहंडी उत्सवाला खेळाचा दर्जा मिळावा यासाठी गोविंदांनी पाच ते सहा वर्षे न्यायालयात लढा दिला. त्यामुळे यंदा आम्ही मानाची दहिहंडी रचणार आहोत. दहिहंडीच्या दिवशी थर लावण्यासाठी मंडप उभारणीसाठी वापरण्यात येणार्या शिडीचा वापर करण्यात येणार आहे. शिडीचा वापर करून थर रचण्यासंदर्भात क्लबच्या गोपिकांनी सरावही केला आहे. त्यानुसार बुधवारी दहिहंडीच्या दिवशी थर रचण्यात येणार आहे, अशी माहिती दहिहंडी समन्वय समितीच्या सचिव आणि पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्षा गीता झगडे यांनी दिली.
दरवर्षी दहिहंडी उत्सवाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. यंदा कोरोनाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दहिहंडी उत्सवही साजरा न करण्याचा निर्णय दहिहंडी समन्वय समितीने घेतला आहे. परंतु, आपली संस्कृती टिकली पाहिजे आणि संकटांवर मात करणे हेच गोविंदांचे ध्येय असते हे दाखवून देण्यासाठी पार्ले स्पोर्ट्स क्लबने बुधवारी सोशल डिस्टन्सिंग राखत मानाची दहिहंडी उभारून थर लावण्याचा निर्धार केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी